
no images were found
शहरातील रस्त्यांसाठी 40 कोटी देऊ : पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाल्यामुळे शहराची ती प्रमुख समस्या बनली आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा, महिनाभरात प्राधान्याने रस्त्यांची कामे करा, असे सांगत रस्त्यांसाठी 40 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. दसरा महोत्सवासह कोल्हापूर महोत्सवही साजरा करण्यात येईल, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 25 लाखांची तरतूद करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा घेतला. नगरोत्थानमधून महापालिकेला 10 कोटी रुपये मिळतील. त्यातून प्रमुख रस्त्यांची कामे प्राधान्याने करा. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांची मंगळवारी (दि.10) भेट घेऊ आणि 40 कोटी रुपये शहराच्या रस्त्यांसाठी देऊ, असेही केसरकर यांनी सांगितले.
शाहू मिलमधील राजर्षी शाहूंचे स्मारक हे आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे सांगत त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करा, कोणतीही इमारत न पाडता, तिचे संवर्धन आणि जतन करा, तिच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या, सहा महिन्यांत या सर्व इमारती पूर्वीप्रमाणे झाल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या इमारतीत कन्व्हेन्शन सेंटर, कौशल्य विकास केंद्र सुरू होईल. याखेरीज राजर्षी शाहूंचा पुतळा, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रमुख घटनेचे शिल्प आणि महाराणी ताराराणी यांच्यापासून संस्थानाच्या राज्यकर्त्यांचा इतिहास सांगणारा फलक या ठिकाणी असेल. सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेऊन पुढील कामे करा, असेही त्यांनी सांगितले.
पंचगंगा घाट आणि शिवाजी पूल सुशोभीकरणाचे काम हाती घ्या. येत्या महिन्याभरात ही कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे सांगत शिवाजी पुलावर फूड कोर्ट सुरू होईल, ते महिला बचत गटाकडे द्या, पंचगंगा घाट आणि शिवाजी पुलाला आकर्षक कायमस्वरूपी रोषणाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भवानी मंडपातील पागा इमारतीत अंबाबाईचे भाविक आणि पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, चेंजिंग रूम आदी सुविधांची कामे येत्या 15 दिवसांत सुुरू करा, त्यासाठी वेळ घालवू नका, प्रशासकीय परवानगी, मान्यता आदी कोणत्याही बाबी प्रलंबित ठेवू नका, असेही त्यांनी अधिकार्यांना बजावले. भवानी मंडप ते न्यू पॅलेस या हेरिटेज रस्त्यासाठीही काम सुरू करा. या रस्त्यावर 32 ठिकाणे हेरिटेज वर्गवारीतील आहेत, त्यांना रोषणाईसह रस्त्यावर सजावट, ऐतिहासिक लूक देणे, फुटपाथ आदी कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वच कामांना सोमवारच्या आढावा बैठकीत मंजूर निधी वर्ग करण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खिद्रापूर, हुपरीसह सहा ठिकाणी महोत्सव दसरा महोत्सवादरम्यानच कोल्हापूर महोत्सव घेतला जाईल. दसरा महोत्सवाला राज्य शासन एक कोटी, तर कोल्हापूर महोत्सवाला जिल्हा नियोजनमधून 25 लाखांचा निधी दिला जाईल.याखेरीज पन्हाळा, आंबा, राधानगरी, पारगड, खिद्रापूरसह हुपरी किंवा इचलकरंजी अशा सहा ठिकाणीही महोत्सव घेतले जातील.