no images were found
कॉ. पानसरे हत्या प्रकरणी १० आरोपींवर दोषनिश्चिती
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुख्य संशयित डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय ४८, रा. कोल्हापूर) याच्यासह १० आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दोषनिश्चिती करण्यात आली. आरोपींनी पानसरे यांची हत्या आणि कटाचा आरोपही नाकबूल केला. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात झालेल्या दोषनिश्चितीमध्ये डॉ. तावडेसह समीर विष्णू गायकवाड (सांगली), अमोल अरविंद काळे (पिंपरी चिंचवड), वासुदेव भगवान सूर्यवंशी (जळगाव), भरत जयवंत कुरणे (बेळगाव), अमित रामचंद्र डेग्वेकर (दोडामार्ग, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (औरंगाबाद), सचिन प्रकाशराव आंदुरे (औरंगाबाद), अमित रामचद्र बद्दी (हुबळी), गणेश दशरथ मिस्कीन (धारवाड) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी 12 आरोपींविरुद्ध यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वरील १० आरोपींशिवाय विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, कराड) व सारंग दिलीप अकोळकर-कुलकर्णी (शनिवार पेठ, पुणे) या दोघांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे; तर समीर गायकवाडची जामिनावर सुटका झाली आहे. दोषनिश्चितीसाठी आरोपींना न्यायालयात हजर ठेवण्याच्या निर्देशानुसार डॉ. तावडेसह तिघांना येरवडा कारागृह तर सचिन आंदुरे, शरद कळसकरसह ६ जणांना बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहातून बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयीन कामकाजाच्या सुरुवातीलाच जिल्हा व सत्र न्यायाधिश तांबे यांनी आरोपी गणेश मिस्कीनला उद्देशून पानसरे हत्येचा गुन्हा कबूल आहे का? असे विचारले असता त्यावर आरोपीने हे नाकबूल असल्याचे सांगितले. आंदुरे, डेग्वेकर, काळे, कळसकर, कुरणे, सूर्यवंशी, बद्दी, डॉ. तावडे, गायकवाड यांनीही गुन्हा नाकबुल केला.
याप्रकरणी पुणे येथील आरोपींना कोल्हापूरला आणण्यात विलंब लागल्याने कामकाजास दुपारनंतर सुरुवात झाली. दरम्यान आरोपींच्या नातेवाईकांना सुरक्षा यंत्रणेकडून आरोपींना भेटण्यास मनाई करण्यात आली. या सुनावणीसाठी बंगळूर येथील मध्यवर्ती कारागृहातून ६ आरोपींना रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरात आणण्यात आले होते. दीर्घ अंतराच्या प्रवासामुळे सुरक्षा यंत्रणांवर मर्यादा येत असल्याचे बंगळूर पोलिस अधिकार्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. १ दिवस आरोपींना कळंबा जेलमध्ये ठेवण्याची विनंती केली. या खटल्याबाबतची पुढील सुनावणी सोमवार दि. २३ जानेवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खटल्याची नियमित सुनावणी शक्य असल्याचे सांगण्यात आले.