
no images were found
‘पाटगाव’मधून एक थेंबही पाणी अदानी वीज प्रकल्पास देणार नाही
कोल्हापूर(प्रतिनिधी): अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी पाटगावच्या मौनीसागर जलाशयातील पाण्याचा थेंबही न देण्याचा निर्धार सर्वपक्षीय आंदोलकांनी केला. अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी येथे हुतात्मा क्रांती चौकात गुरुवारी सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन झाले.
या वेळी माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, राहुल देसाई, सत्यजित जाधव, शामराव देसाई प्रमुख उपस्थित होते. के. पी. पाटील म्हणाले, की पाटगाव जलाशयातून तळकोकणात होणाऱ्या अदानी यांच्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी पाणी देण्याची संमती शासनाने दिली आहे. प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र, कर्नाटकच्या नागरिकांना घेऊन व्यापक आंदोलनाची गरज आहे.
प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले, की भूमिपुत्रांवर अन्याय करून अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी पाटगाव जलाशयातून पाणी जाणार असेल तर पाण्याचा थेंब जाऊ देणार नाही. यासाठी लढा उभारू. पाटगाव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक थेंब भुदरगडवासियांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पावर सर्वाधिक गावे, वाड्यावस्त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
पाटगाव प्रकल्पाचे पाणी भुदरगड तालुक्यासाठी जीवनदायी आहे. कारण सर्वाधिक गावांसाठी प्रकल्पाचे पाणी पिण्यास, शेतीसाठी वापरले जाते. या प्रकल्पामुळे तालुक्यातील सुमारे १२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. उर्वरित पाणी नदी खोऱ्यातील भविष्यकालीन योजनांसाठी आवश्यक आहे.
पाटगाव प्रकल्पामध्ये मूळ नदी स्रोतातून येणारे पाणी कमी असल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी खूप कालावधी लागतो. प्रस्तावित पाटगाव प्रकल्पांतर्गत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत अंजिवडे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) गावाजवळ नवीन धरण बांधण्यात येणार असून, त्या धरणामध्ये तळंबा खोऱ्यातील साठविलेले पाणी उचलून पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठवणार आहे.
त्याद्वारे २१०० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे भुदरगड तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत उभारण्यात येणारा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प इतर ठिकाणी उभारावा, अशी मागणी होत आहे.