no images were found
कोल्हापूर पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहणार: श्रीमंत शाहू महाराज
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शिव-शाहू काळात सर्वजण सलोख्याने राहिले आहेत. सर्व जाती-धर्मातील जनतेनं सलोख्याने राहिलं पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जोपासणं म्हणजे सोपं नाही. पुरोगामी विचार पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. पुरोगामी विचार हे नेहमी पुरोगामीच असतात, त्याला कुणी मागे खेचू शकत नाही. मानवतावादी विचार ठेवून आपण पुढे चालले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराज यांचा ७ जानेवारी रोजी अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी कोल्हापुरात साजरा केला जाणार आहे. ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सलोखा रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने शाहू महाराज यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध सामाजिक मुद्यांवर भाष्य केले. शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापूर हे पुरोगामी आहे आणि पुरोगामीच राहणार आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचा विचार एकच आहे. मध्यंतरी काही बिघडलं असेल, पण आता सगळं योग्य दिशेला चाललं आहे.
शाहू महाराज यांनी आताच्या राजकीय परिस्थितीवर समाधानी होणं कठिण असल्याचे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, महापुरुषांच्या बाबतीत वाद होऊ नयेत, लोकशाहीत विचार वेगवेगळे असू शकतात. जनतेला जो दूरदृष्टी असलेला नेता दिसतो तोच मोठा नेता असतो. नेत्यांनी सामाजिक भान ठेवणे हे सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आता मोबाईल आला आहे, पण थेट संवाद हा नेहमी चांगला असतो. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अमृतमहोत्सवी वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी विविध मान्यवरांनी बैठकीत सूचना केल्या. कोल्हापुरातील सर्व जाती-धर्मातील एकोपा टिकून राहण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.