
no images were found
जिममध्ये व्यायाम करताना हॉटेल चालकाचे हार्ट अटॅकने निधन
इंदूर: येथील जिममध्ये व्यायाम करत असताना एका हॉटेल चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने काहीच क्षणात त्यांचा मृत्यू झाला. जिममध्ये या व्यक्तीची अचानक तब्येत बिघडली आणि तो चक्कर येऊन खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, काहीच वेळात त्याचा मृत्यू झाला. ५३ वर्षीय प्रदीप रघुवंशी असं मृत व्यक्तीचं नाव असून ते वृंदावन हॉटेलचे संचालक होते. निरोगी राहण्यासाठी ते रोज जिममध्ये जात असत. रघुवंशी हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचीही माहिती आहे.
रघुवंशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मुलीचे लग्न १७-१८ जानेवारीला होते. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका वाटण्यासही सुरुवात केली होती. मात्र, मुलीचे हात पिवळे होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ज्या घरात आठवड्याभराने शुभकार्य होणार होतं, त्याच घरात आता शोककळा पसरली आहे. रघुवंशी यांचे मित्र आणि नगरसेवक राजेंद्र राठोड यांनी सांगितले की, त्यांना १५ वर्षांपूर्वीही हृदयाचा त्रास झाला होता.
तेव्हा त्यांच्या हृदयाच्या धमनीत रक्ताभिसरण थांबत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशननंतर ते ठीक झाले आणि नियमित जिममध्ये जायचे. जिम ट्रेनर नितीन छपरवाल यांनी सांगितले की, प्रदीप हे गेल्या सात वर्षांपासून व्यायामासाठी जिममध्ये येत होते. ते त्यांच्या तब्येतीबाबत गंभीर होते. ते आठवड्यातून पाच दिवस जिमला जात असत.