no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बाॅक्साईट उत्खनन सुरू करण्याच्या सरकारच्या हालचाली; पर्यावरण तज्ज्ञांकडून भीती व्यक्त
कोल्हापूर : जिल्ह्यात पुन्हा बाॅक्साईट उत्खनन सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरु करण्यासाठी १८ गावे वगळण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भुदरगडमधील देवकेवाडीत औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे यासाठी १८ गावे बघावेत अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहेत. या संवेदनशील क्षेत्रांपैकी ३१ गावे वगळावेत अशी राज्य सरकारची मागणी आहे. यापैकी १७ गावात बॉक्साईटचे उत्खन सुरू करण्यासाठी एका गावात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी आणि उर्वरित १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याने ती सर्व गावे वगळण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बॉक्साईट उत्खनन सुरु होणार आहे.
यामुळे राज्य सरकारने सुरु केलेल्या प्रयत्नांवर ज्येष्ठ पर्यावरण अभ्यास डॉ. मधुकर बाचूळकर यांनी भीती व्यक्त केली आहे. पर्यावरण प्रेमींनी संवेदनशील क्षेत्रातील कोणतीही गावे वगळू नयेत अशी मागणी करणारी पत्रे ई-मेल, केंद्र व राज्य सरकारला पाठवावीत, असे आवाहन बाचूळकर यांनी केलं आहे. राज्यासाठी जाहीर केलेल्या १७३४० चौरस किलोमीटर संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट २१३३ गावांपैकी ३८८ गावे वगळण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. आजरा तालुक्यातील हाजगोळी खुर्द केराकबोळ, भुदरगड तालुक्यातील बिद्री, हणबरवाडी, मुरुकाटे, फणसवाडी राधानगरी तालुक्यातील करंजफेण, सावर्डे, शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी, म्हाळसवडे, पणुंद्रे, शिरोळे तर्फ मलकापूर, सोनुर्ले ही १३गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.
चंदगड तालुक्यातील ओगोली, धामापूर, कानूर खूर्द, पिलानी, पुंद्रा, शाहूवाडी तालुक्यातील मुरंबा, धनगरवाडी, गिरगाव, मानोली, निवळे, शिरोळे तर्फ वारूण, उदगिरी, येळवण जुगाई, राधानगरी तालुक्यातील पडसाळी, पाटपन्हाळा आणि रामनवाडी आणि भुदरगड तालुक्यातील वासणोली अशा एकूण १७ गावात उत्खनन सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.