no images were found
करोनामध्ये निधन झालेल्या पत्नीचा पतीने तिचा हुबेहुब पुतळा उभारला
कोलकाता : दोन वर्षांपूर्वी करोना संसर्गामुळं पत्नीचा मृत्यू झाला. मात्र, पत्नीच्या प्रेमाखातर पतीने तिचा सिलिकॉन आणि मेणाचा हुबेहुब पुतळा तयार करुन घेतला. कोलकाता येथील कैखाली येथे राहणाऱ्या तापस शांडिल्य यांनी तब्बल २.५ लाख रुपये खर्चे करुन आपली पत्नी इंद्राणीचा पुतळा तयार करुन घेतला आहे.
इंद्राणी यांना करोनाचा संसर्ग झाला होता. पत्नीच्या प्रेमाखातर शांडिल्य यांनी तिचा पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला. तब्बल २.५ लाख रुपये खर्चे करुन हा पुतळा तयार करण्यात आला आहे. इंद्राणी यांच्या घरातच हा पुतळा त्यांच्या आवडत्या जागी बसवण्यात आला आहे. तापस शांडिल्य हे सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत. आपल्या पत्नीच्या आठवणीत भावूक झालेले तापस सांगतात की, काही वर्षांपूर्वी ते मायापूर येथील इस्कॉन मंदिरात गेले होते. तिथे भक्तिवेदांत स्वामी यांची सजीव प्रतिमा इंद्राणी यांना खूप आवडली. त्याच वेळी त्यांनी त्यांच्या पतीकडे मस्करीत माझाही असाच पुतळा उभारा, असं म्हटलं होतं. खरं तर इंद्राणीने मस्करी केली होती.
तापस यांनी तीच गोष्ट गांभीर्याने घेतली. अखेर पत्नीच्या निधनानंतर त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. पुतळा साकारण्यासाठी त्यांना सहा महिन्याचा कालावधी लागला. या पुतण्याचे वजन जवळपास ३० किलो असून सोन्याचे दागिनेही चढवण्यात आले आहेत. इंद्राणी यांचे आवडते दागिने या पुतळ्याला घालण्यात आले आहेत. तर, त्यांच्या मुलाच्या लग्नात नेसलेली आसामची एक रेशमी साडी त्यांच्या पुतळ्याला नेसवण्यात आली आहे.