no images were found
शाहू महाराजांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा
कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त स्विमिंग हब फाउंडेशनच्यावतीने पाच ते आठ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये राष्ट्रीय (निमंत्रित) जलतरण स्पर्धा कोल्हापुरात होत आहेत. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आठ ते २१ वर्षे वयोगटातील तब्बल ३१५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्विमिंग हब फाउंडेशनचे दीपक घोडके, निलेश जाधव, उमेश कोडोलीकर, रमेश मोरे, सदानंद सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत स्पर्धेविषयी माहिती सांगितली. या स्पर्धेसाठी दहा गटांमध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व विशेष प्राविण प्रमाणपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे आहेत. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ज्या पद्धतीने स्पर्धेचे समालोचन केले जाते त्याच पद्धतीने यूट्यूब चॅनेलवर पूर्ण स्पर्धेचे चित्रीकरण व समालोचन प्रसारित केले जाणार आहे. या स्पर्धेत राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, ओडिसा व महाराष्ट्र या राज्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेमध्ये टच पॅडचा वापर केला जाणार आहे. स्पर्धा १३४ प्रकारांमध्ये खेळली जाणार आहे. एकूण १२७८ राउंड होणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पाच जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजता मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे.निमंत्रितांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धा ही रयत शिक्षण संस्थेच्या राजश्री छत्रपती शाहू कॉलेज येथील राष्ट्रीय खेळाडू सागर पाटील जलतरण तलाव कदमवाडी येथे होणार आहे..
तास्वेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत झाला. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली चित्रदुर्ग मठ येथे बैठक झाली. वसंतराव मुळीक म्हणाले, “श्रीमंत शाहू महाराज यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येईल.”स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी शाहू महाराजांचा वाढदिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे साजरा करू या”. सी. एम.गायकवाड यांनी शहरातील शाळांनी फेरी काढून महाराजांना शुभेच्छा द्याव्यात अशी सूचना मांडली.
गणी आजरेकर यांनी मुस्लिम बोर्डिंगतर्फे निबंध स्पर्धा, फळे वाटप असे उपक्रम होतील असे सांगितले. दगडू भास्कर, सुभाष देसाई, कादर मलबारी, संदीप शिंदे, भाऊसाहेब काळे, शाहीर दिलीप सावंत यांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या. चर्चेत गुलाबराव घोरपडे, बबनराव रानगे, अनिल कदम, राजेंद्र ढवळे, रघुनाथ मोरे, छगन नांगरे, जी. बी. कांबळे बबन शिंदे, शैलजा भोसले, बाबा जांभळे यांनी सहभाग घेतला.