
no images were found
चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोविड-१९ निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये परत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. फक्त चीनच नव्हे तर युरोप आणि अजून काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे.
एपिडेमियोलॉजिस्टच्या अंदाजनुसार, पुढील ९० दिवसांत चीनमधील ६० टक्के आणि पृथ्वीच्या १० टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता असून लाखो लोकांना मृत्यू ओढवू शकतो. चीनमधील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता भारतीयांना नविन वर्षाचे स्वागत करण्यावर निर्बंध तर येणार नाहीत ना? अशी शंका भेडसावतेय. याबाबत उत्तरादाखल कोविड 19 वर्किंग ग्रुप एनटीजीआयचे अध्यक्ष एनके अरोरा यांनी सांगितले नुसार, ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत आहोत की चीनमध्ये कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. जोपर्यंत भारताचा संबंध आहे, भारतातील मोठ्या संख्येने लोकांना कोविड विरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे. लस विशेषत: प्रौढ लोकसंख्येसाठी देण्यात आली आहे. एनके अरोरा पुढे म्हणाले की, INSACOG डेटा दर्शवितो की, जगात सर्वत्र आढळणारे ओमिक्रॉनचे जवळजवळ सर्व उप-प्रकार भारतात आढळतात. येथे प्रचलित नसलेल्या अनेक उप-प्रकार नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याने घाबरण्याची गरज नाही.
चीनमधील परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली आहे की चिनी कम्युनिस्ट पक्षाने तर म्हटले आहे की, ज्याला संसर्ग व्हायचा आहे, त्याला संसर्ग होऊ द्या, ज्यांना मरायचे आहे त्यांना मरू द्या. आरोग्य तज्ज्ञाने असाही दावा केला आहे की आता चीनमध्ये संक्रमित लोकांची संख्या एका दिवसापेक्षा कमी वेळात दुप्पट होऊ शकते. चीनमध्ये कोरोना कहर झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे रूग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचीही कमतरता असताना औषध आणि ऑक्सिजनचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आलेले आहेत.
चीनमधील कोरोना रूग्णसंख्या पाहता जगभरात सतर्कता बाळगली जात आहे. भारतातही खबरदारी घेतली जात आहे. या पार्पश्रवभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. जर एखादा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.
चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारतात वेळेतच काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. भारताचे यासंदर्भात काय नियोजन असेल, त्याची रूपरेषा काय असेल याबाबत आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडतेय.