no images were found
ग्रामपंचायत निवडणूक : मतदानाकरिता भरपगारी सुट्टी वा दोन तासांची सवलत
कोल्हापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदान होत आहे. या दिवशी मतदार असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी वा दोन तासांची सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती सहायक कामगार आयुक्तांनी दिली आहे.
परिपत्रकानुसार निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येत आहे. सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.