no images were found
मडिलगे बुद्रुक येथून अल्पवयीन मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न
मडिलगे बुद्रुक : मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथून अल्पवयीन मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्यास ग्रामस्थांनी पकडून चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. संतलाल केवट (वय ४०, रा. आत्मज, उत्तरप्रदेश, सध्या राहणार मुदाळतिट्टा, आदमापूर, ता. भुदरगड) असे या संशयिताचे नाव आहे.
मडिलगे खुर्द रस्त्यावरून तरुण आणि लहान मुले व्यायामाच्या निमित्ताने पळत जात असतात. शनिवारी सायंकाळी साधारण ६.३० वाजता मार्गदर्शक आरोग्य विभागातील कर्मचारी अमर फडतारे यांच्यासोबत ही मुले धावत होती. तरुण मुले धावत असताना गावातील एक १० वर्षांचा मुलगा त्यांच्या मागोमाग सायकलवरून जात होता. हे सर्वजण परतीच्या वाटेवर असताना ओढ्यावरती त्या लहान मुलाची सायकल त्यांना दिसली.
अमर फडतारे यांना गारेगार विकणार्याची मोटारसायकल आणि त्या बालकाची सायकल ओढ्यावर पडलेली दिसताच त्यांना शंका आली. त्यांनी त्या मुलास हाक मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो उसातून ओरडत पळत बाहेर आला आणि त्याने आपल्याला जबरदस्तीने पकडून नेल्याचे सांगू लागला. तो ओरडू नये म्हणून संशयिताने त्याचे तोंड दाबून धरले होते. तो मुलगा त्याच्या तावडीतून कसाबसा सुटून आला. तो घाबरलेल्या अवस्थेत होता. उपस्थित सर्व तरुणांनी केवटला उसातून शोधून बाहेर आणले असता तो काहीही कारणे सांगू लागला. चाललेला गोंधळ ऐकून सभोवतालचे लोक जमा झाले. केवटला जमावाने चोप देत पोलिसांना फोन करून बोलावले. नंतर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळावरून संशयितास अटक केली.