
no images were found
पंकजा मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बेबनाव यापूर्वी अनेकदा समोर आलेला आहे. मात्र आज पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी पंकजा मुंडे जवळपास अर्धा तास होत्या. त्यांच्यामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही. निवासस्थानाबाहेर उपस्थित माध्यम प्रतिनिधींनाही त्यांनी बोलण्याचं टाळलं.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी खा. प्रितम मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र भाजपच्या नेतृत्वाने भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद दिलं. त्यावेळी पंकजा मुंडे यांची नाराजी उघड झाली होती. मुंबईतल्या वरळी येथील कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आपलं नेतृत्व दिल्लीत असल्याचं पंकजांनी स्पष्ट केलं होतं. शिवाय मागच्या अनेक राजकीय घडामोडींवरुन पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वितुष्ट समोर आलेलं आहे.