no images were found
कोल्हापूरमधील हमालाच्या कन्येनं MPSC परीक्षेत उमटवला ठसा OBC महिलांमधून राज्यात पहिली
कोल्हापूर : परिस्थिती बिकट असतानाही आपली चुणूक दाखवत कोल्हापूरच्या एका कन्येने एमपीएससीमधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे तिचे कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं जोगेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसले आहे. या गावातील रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या मुलीने आपल्या नावाचा ठसा एमपीएससी परीक्षेतून उमटवला आहे. रेश्माने जोगेवाडी गावातच तिचे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले. तर ५ वी ते १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण तळाशी येथील शाळेत तिने पूर्ण केले. बिद्री येथे १२वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने मॅकॅनिकल या ब्रांचमधील डिप्लोमाची पदवी पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे प्राप्त केली. तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने बी.ई. मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच रेश्माने एमपीएससी परीक्षेत आपलं नाव कमविण्याची जिद्द धरली होती. बी.ई. नंतर तिने एमपीएससी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला होता. पण काही परीक्षांमध्ये अगदी थोड्या गुणांनी अपयश आले होते. तरी देखील खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. आणि त्यातूनच आता राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत यश प्राप्त झाले आहे, असं मत रेश्माने सांगितलं.
रेश्माचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे भोगावती साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. रेश्माला आणि तिच्या भावांना संपूर्ण शिक्षण पूर्ण करू देताना वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. पैशाची कोणतीही कमतरता न जाणवू देता त्यांनी रेश्माला सर्व बाजूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता तिच्या यशाने त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हमाली करत असून देखील बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवले आहे.