
no images were found
महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत सुरु
कोल्हापूर : गेल्या काही तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी गेल्या मंगळवारी हैदोस घातला होता.
हिरे बागेवाडीजवळ राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सीमा समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई बेळगावला जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेणार होते. मात्र, मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कन्नड संघटनांनी बेळगावात हैदोस घालण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या साठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे.