Home आरोग्य कोल्हापुरातील कसबा बावडा सेवा रुग्णालयात आता ‘यलो फिव्हर’लसीकरण केंद्र सुरू होणार !

कोल्हापुरातील कसबा बावडा सेवा रुग्णालयात आता ‘यलो फिव्हर’लसीकरण केंद्र सुरू होणार !

0 second read
0
0
13

no images were found

कोल्हापुरातील कसबा बावडा सेवा रुग्णालयात आता ‘यलो फिव्हर’लसीकरण केंद्र सुरू होणार ! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भर

मुंबई/कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांना तसेच परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर येथील कसबा बावडा परिसरातील सेवा रुग्णालयात ‘यलो फिव्हर’ लसीकरण केंद्र  सुरू करण्यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या केंद्राच्या स्थापनेसाठी सेवा रुग्णालय, कसबा बावडा यांच्याकडून आवश्यक परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य कार्यालयात सेवा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

या केंद्रासाठी यलो फिव्हर लसींचा पुरवठा केंद्र शासनामार्फत केंद्रीय संशोधन संस्था, कसौली यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लसींच्या खरेदीसाठी सुरुवातीला संस्थेला स्वतःच्या निधीतून आर्थिक तरतूद करावी लागणार असून, त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रतिपूर्ती पद्धतीने लसींचा पुरवठा केला जाणार आहे.

केंद्राच्या कामकाजासाठी लसीकरणाचे वेळापत्रक, केंद्राची माहिती तसेच आवश्यक तपशील निर्धारित नमुन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच केंद्राच्या मासिक लस वापर अहवालासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्याला स्वतंत्र लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून परदेशात, विशेषतः यलो फिव्हरचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना आवश्यक यलो फिव्हर लसीकरणाची सुविधा कोल्हापुरातच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिकांचा इतर शहरांमध्ये जाण्याचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावलीनुसार सुरक्षित लसीकरण सेवा सुनिश्चित करणे या दृष्टीने सेवा रुग्णालयातील यलो फिव्हर लसीकरण केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…