no images were found
‘निर्यातवाढ’ देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ताकद देणारी-हेमंत पाटील : भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत ४४ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ!
मुंबई/पुणे,: भारताला जागतिक उत्पादन क्षेत्रातील आघाडीचा देश बनविण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला सकारात्मक यश मिळत असून, देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत झालेली ऐतिहासिक वाढ ही त्याची महत्त्वपूर्ण पावती आहे, असे प्रतिपादन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.20) केले.
आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात तब्बल ४४ टक्क्यांनी वाढून ३१.९७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. पाटील यांनी या कामगिरीचे स्वागत करून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या धोरणात्मक संकल्पनांचे कौतुक केले.
भारताने केवळ देशांतर्गत बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यापुरते मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेत स्वतःची मजबूत ओळख निर्माण करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन निर्यातीबरोबरच इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीत झालेली वाढ ही भारतीय उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक बाब आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
स्मार्टफोन निर्यातीत ३५.८ टक्क्यांची वाढ होऊन ती १८.१७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर नॉन-स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत ५६.५ टक्क्यांची वाढ नोंदवून ती १३.७९ अब्ज डॉलरवर गेली आहे. माउंटेड प्रिंटेड सर्किट बोर्ड निर्यातीत ३२१९ टक्के, मेमरी इंटिग्रेटेड सर्किटमध्ये २३३३ टक्के आणि सॉलिड स्टेट स्टोरेज उपकरणांच्या निर्यातीत १६८० टक्क्यांची वाढ ही विशेष उल्लेखनीय आहे.
केंद्र सरकारने उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देणारी धोरणे, औद्योगिक पायाभूत सुविधांचा विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि निर्यातक्षम उद्योगांना चालना देण्यावर सातत्याने भर देणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील ही वाढ देशात रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, गुंतवणूक आणि उद्योगांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण करू शकते, असे पाटील म्हणाले.
भारताने जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर उत्पादन, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करण्यावरही भर द्यायला हवा. आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादन क्षमता वाढविणे ही काळाची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पना केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष उत्पादन, निर्यात आणि आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून साकार होत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीतील ही वाढ दर्शवते. विकसित भारत २०४७ च्या ध्येयाकडे वाटचाल करताना केंद्र सरकारची उद्योगाभिमुख धोरणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी देशाच्या आर्थिक सामर्थ्याला नवी दिशा देतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.