no images were found
पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपची संघटनात्मक मोर्चेबांधणी; २५ विधानसभा प्रभारींच्या नियुक्त्या!
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक तयारीला गती; डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी जबाबदारी निश्चित
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्रजी चव्हाण यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे विभागातील २५ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमुळे निवडणुकीच्या नियोजनाला विधानसभा स्तरावर अधिक स्पष्ट दिशा देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
या नियुक्त्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हडपसर, जुन्नर, बारामती, वडगाव शेरी, पिंपरी, भोर, मावळ, शिरूर, इंदापूर आणि खेड-आळंदी यांसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधून निवडणुकीच्या तयारीला गती देण्याची जबाबदारी नियुक्त प्रभारींवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय भाजपच्या मतदारसंघात आमदार ते मंडल अध्यक्ष अशी जबाबदारी निश्चित करण्यात आली असून. पक्ष यंत्रणेचे कामही सुरू झाले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी या प्रभारींचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षक व पदवीधर मतदारांशी संपर्क, मतदार यादीविषयक समन्वय, स्थानिक प्रश्नांचा आढावा आणि पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेचे प्रभावी नियोजन यावर भर दिला जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आता विधानसभा स्तरावर जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. या माध्यमातून पक्षातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.