no images were found
अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन आणि कच्छ विद्यापीठाकडून कच्छमध्ये ग्रीन एनर्जी क्षेत्रातील रोजगारांना चालना देण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना
भुज, : अदाणी समूहाची कौशल्यविकास आणि क्षमता निर्माण करणारी संस्था अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन (ASE) आणि कच्छ विद्यापीठाने आज गुजरातमधील भुज येथील विद्यापीठाच्या परिसरात ग्रीन एनर्जी क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे उद्घाटन केले.
गेल्या दोन वर्षांत कच्छ जिल्ह्यात अदाणी समूहाच्या ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उपक्रमांमुळे 21,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. यामुळे अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांची उभारणी, संचालन आणि देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी हे सेंटर ऑफ एक्सलन्स महत्त्वाची भूमिका बजावणार असून, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील विविध मूल्यसाखळ्यांमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाणार आहे. तसेच, तरुणांना आपल्या घराजवळच उद्योगाशी जोडलेले प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
गुजरातचे माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी 10,000 हून अधिक कच्छ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये सोलर पीव्ही टेक्नॉलॉजीज, विंड एनर्जी सिस्टिम्स, हायब्रिड सिस्टिम्स, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम्स (BESS) आणि डिजिटल अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन यांचा समावेश आहे. याशिवाय, ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उपयोजित संशोधन आणि उद्योजकतेलाही या केंद्राकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
अदाणी समूहाचे संचालक श्री. करण अदाणी म्हणाले, “भारताचे भविष्य घडवणाऱ्या क्षेत्रांमध्ये काम करणे हा अदाणी समूहाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ग्रीन एनर्जी हे असेच एक महत्त्वाचे क्षेत्र आहे—जे देशाच्या प्रगतीसाठी तसेच भावी पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे जागतिक दर्जाचे सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यार्थ्यांना केवळ आजच्या रोजगारांसाठीच नव्हे, तर भारतात आणि जगभरात निर्माण होणाऱ्या नव्या संधींसाठीही सक्षम करेल.”
अदाणी स्किल्स अँड एज्युकेशन (ASE) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. रॉबिन भौमिक म्हणाले, “अक्षय ऊर्जा उद्योगाचा वेगाने विस्तार होत आहे; मात्र या क्षेत्राला आवश्यक असलेले विशेष कौशल्य असलेले मनुष्यबळ त्याच वेगाने उपलब्ध होत नाही. हीच दरी भरून काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कच्छ विद्यापीठासोबत काम करताना उद्योगाच्या गरजा वर्गखोल्यांपर्यंत आणता येतील, विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष काम करणार असलेल्या तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल आणि शिक्षणातून रोजगारापर्यंतचा त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल.”
भारत 2030 पर्यंत 500 गिगावॅट (GW) बिगर-जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने अक्षय ऊर्जेचा विस्तार करत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणातील पायाभूत सुविधा तसेच विशेष तांत्रिक कौशल्यांची मागणी वाढत आहे. कच्छमध्येही या क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. खावडा येथे अदाणी समूह 538 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात 30 GW क्षमतेचा अक्षय ऊर्जा पार्क विकसित करत आहे. हे क्षेत्रफळ पॅरिस शहराच्या आकारमानाच्या पाच पट आहे. यामुळे सौर, पवन ऊर्जा, ऊर्जा साठवणूक आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची मागणी निर्माण होत आहे.
या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ‘शिका, सराव करा, अनुभव घ्या, प्रमाणित व्हा आणि करिअर घडवा’ (Learn, Practise, Experience, Certify and Career) या संरचित पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. यामध्ये वर्गातील शिक्षणासोबत सिम्युलेशन-आधारित आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असेल. अभ्यासक्रमात सोलर पीव्ही, विंड एनर्जी, रिन्यूएबल एनर्जी इंटिग्रेशन, BESS आणि मायक्रोग्रिड्स यांसोबतच डिजिटल प्रणालींचा समावेश आहे. यामध्ये औद्योगिक उपकरणांचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा अॅक्विझिशन (SCADA), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित ऊर्जा डेटा आणि स्मार्ट-ग्रिड तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
भारताच्या विकासासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर सक्षम आणि कुशल मनुष्यबळाची परिसंस्था निर्माण करण्याच्या ASE च्या व्यापक प्रयत्नांचा हा उपक्रम एक भाग आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन आणि उद्योजकतेमध्ये सहभागी होण्याच्या संधी मिळतील. तसेच, त्यांना आपल्या घराजवळच अक्षय ऊर्जा क्षेत्रात करिअर घडवण्याची आणि उद्योगाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.