no images were found
अदाणी एअरपोर्ट्सकडून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1B च्या उत्तर विभागाच्या पुनर्विकासाला सुरुवात
मुंबईतील 91% प्रवासी वाहतूक प्रभावित होणार नाही
मुंबई, : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) संचालित मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1B च्या उत्तर विभागाच्या पुनर्विकासाला सुरुवात करणार आहे. 60 वर्षे जुन्या या इमारतीशी संबंधित सुरक्षेच्या चिंतेमुळे सदर टर्मिनलचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई विमानतळाच्या (IATA कोड – BOM) दरवर्षी सुमारे 55 दशलक्ष प्रवाशांपैकी (mppa) केवळ सुमारे 5 दशलक्ष प्रवाशांची (सुमारे 9%) वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवासी सेवांमध्ये सातत्य राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमीत कमी करण्यासाठी AAHL ने विमान कंपन्यांना त्यांच्या इच्छेनुसार तात्पुरत्या स्वरूपात आपले संचालन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IATA: NMI) स्थलांतरित करण्याचा पर्याय दिला आहे. या संक्रमण प्रक्रियेदरम्यान AAHL विमान कंपन्यांना सहकार्य करणार असून, सेवा सुरळीत आणि अखंडपणे स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणार आहे.
“मुंबई विमानतळाच्या 91% प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. दुरुस्तीची तातडीची गरज असलेल्या जुन्या पायाभूत सुविधांचा पुनर्विकास करत असताना, प्रवाशांची गैरसोय आणि विमानतळाच्या कामकाजावरील परिणाम कमीत कमी ठेवण्यासाठी पहिल्या टप्प्यात केवळ टर्मिनल 1B च्या उत्तर विभागाचे पाडकाम करण्यात येणार आहे. हा विभाग मुंबई विमानतळाच्या T1 क्षमतेच्या सुमारे एक-तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतो. नवी मुंबई विमानतळाकडे होणारे स्थलांतर तात्पुरते असून, मुंबई विमानतळाची प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी स्थलांतरित केली जात नाही,” असे अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे CEO श्री. अरुण बन्सल यांनी सांगितले.
टर्मिनल 1 हे दीर्घकाळापासून सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचे कारण राहिले आहे. प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी व्यवहार्य पर्याय उपलब्ध नसल्याने गेल्या काही वर्षांत केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
यावर्षी एप्रिलमध्ये टर्मिनल 1 येथे आग लागल्याच्या घटनेनंतर तेथील कामकाज सुरू ठेवण्याशी संबंधित जोखीम अधिक ठळकपणे समोर आली आहे. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाले असून, विमान कंपन्या आणि प्रवाशांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे टर्मिनल 1 बंद करून त्याचे टप्प्याटप्प्याने पाडकाम करण्याची नियोजित प्रक्रिया आता आणखी पुढे ढकलता येणार नाही.
T1 च्या पुनर्विकासाला जानेवारी 2027 पासून सुरुवात होणार असून, त्यानंतर त्याची क्षमता सध्याच्या 15 mppa वरून 33% वाढून 20 mppa पर्यंत होणार आहे.
“टर्मिनल 1 च्या भविष्यासंदर्भात 2020 पासून विमान कंपन्यांशी व्यापक चर्चा सुरू आहे. प्रस्तावित पुनर्विकास AERA समोरही मांडण्यात आला होता आणि त्यानंतर त्याचा समावेश मंजूर शुल्क आराखड्यात करण्यात आला. काही विमान कंपन्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची आम्हाला जाणीव आहे. मात्र, प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. ही प्रक्रिया सुरू करण्यात आणखी विलंब केल्यास लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि सोयीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो,” असे श्री. बन्सल यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लँडिंग शुल्कावर 100% सवलत देत आहे. याशिवाय, नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांवर आकारण्यात येणाऱ्या वापरकर्ता विकास शुल्कातील (UDF) फरकाची भरपाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना रोख व्हाउचर देण्याचीही योजना आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आधुनिक आणि पूर्णपणे सुसज्ज विमानतळ असून, मुंबई विमानतळावरून स्थलांतरित होणाऱ्या अतिरिक्त प्रवासी वाहतुकीचा भार हाताळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि क्षमता त्याच्याकडे उपलब्ध आहे. “नवी मुंबई विमानतळाची उपलब्धता असल्यामुळे मुंबई विमानतळावरील T1 चा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करणे शक्य झाले आहे. त्यामुळे संपूर्ण टर्मिनल एकाच वेळी बंद करून प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होण्याची परिस्थिती टाळता येणार आहे,” असे श्री. बन्सल यांनी सांगितले.
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे एकमेकांना पूरक विमानतळ असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील विमान वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवरील मोठ्या ताणाची गरज पूर्ण करण्यासाठी दोन्ही विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.