no images were found
‘वाचूया मराठी… जगुया मराठी’: मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून स्टार प्रवाहचं महाराष्ट्रभरातील मराठीप्रेमींना आवाहन
मराठी भाषा, मराठी साहित्य आणि वाचनसंस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्टार प्रवाह वाहिनीने ‘वाचूया मराठी… जगुया मराठी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील मराठीप्रेमींना आपल्या घरात जपून ठेवलेलं एक मराठी पुस्तक देण्याचं आवाहन करण्यात येणार आहे.
आपल्या घरात अनेक वर्षांपासून जपून ठेवलेली पुस्तकं ही केवळ पुस्तकं नसतात, तर त्यामध्ये आपल्या आठवणी, विचार आणि मराठी साहित्याचा समृद्ध वारसा दडलेला असतो. हाच अनमोल ठेवा आता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. आजही महाराष्ट्रात अनेक शाळा अशा आहेत जिथे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररीची सुविधा उपलब्ध नाही. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या हातात दर्जेदार मराठी साहित्य यावं आणि पुस्तकांमधून त्यांचं विचारविश्व अधिक समृद्ध व्हावं, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
आजच्या डिजिटल युगात पुस्तक वाचनाची सवय जपणं हे एक आव्हान आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि विचारविश्व समृद्ध करण्यात वाचनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच वाचनाची सवय आणि मराठी साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी स्टार प्रवाहने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाला स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्टार प्रवाह वाहिनीचे कलाकार स्वतः या मोहिमेत सहभागी झाले आहेत. आपल्या घरातील आवडतं मराठी पुस्तक या उपक्रमासाठी देत ते महाराष्ट्रातील इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत.
‘मराठी मीडियम’ ही मालिका देखील मराठी माध्यमातून शिक्षण आणि मातृभाषेचं महत्त्व अधोरेखित करते. मालिकेच्या याच विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ‘वाचूया मराठी… जगुया मराठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
चला, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात मराठी पुस्तक पोहोचवूया!वाचूया मराठी… जगुया मराठी!