no images were found
गमावलेला विश्वास उद्धव ठाकरेंनी पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करावा
मुंबई / पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनातील विश्वास गमावला आहे.अनेक आमदार, खासदार, कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.अशात एकाकी पडलेला ठाकरे गट आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ‘भीमशक्ती’चा आधारे घेत आहे.ठाकरे यांनी भीमशक्तीला जरूर सोबत घ्यावे,त्यामुळे राज्यात नव राजकीय समीकरण निर्माण होईल, यात दुमत नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. पंरतु,ठाकरेंनी सर्वात अगोदर त्यांचा गट एकसंघ ठेवण्याचे आव्हान पेलावे,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांच्या नेतृत्वावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत, अशा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणे कितपत योग्य आहे, याचा देखील विचार आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात साठोत्तर काळापासून बाळासाहेब ठाकरे विरुद्ध दलित किंवा नवबौद्ध किंवा शिवसेना विरुद्ध दलित पँथर वा आंबेडकरी संघटना,असा थेट राजकीय-सामाजिक संघर्ष झडत राहिला आहे. हा संघर्ष वैचारिकही आहे.आरक्षण, नामांतर, हिंदुत्व अशा प्रत्येक मुद्दय़ावर हा संघर्ष झडत गेला.
बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या अखेरच्या जीवनखंडात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकोप्याची संकल्पना मांडून किमान राजकीय संघर्ष तरी कमी करण्याचा प्रयत्न केला.अर्थात बाळासाहेबांनी या पूर्वीही आंबेडकरी संघटनांबरोबरच्या वादात व संघर्षांत अनेकदा सामंजस्याची भूमिका घेतली होती.आता स्थिती वेगळी आहे.राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या ठाकरे गटाला भीमशक्ती तारू शकते.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एक नवा पर्याय मतदारांना दिला आहे.वंचितच्या भरवश्यावर ठाकरे गट असला तर, उद्धव यांनी संघटन वाढीसाठी वेगाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.