
no images were found
प्रशांत दामलेंना नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
मुंबई : शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) जाहीर झालेल्या संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यंदाच्या यादीमध्ये मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बर कलाकारांनी स्थान मिळवलेले आहे. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणा-या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये २०१९, २०२० आणि २०२१ असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठी रंगभूमीवरील चिरतरूण अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे नुकतेच १२ हजार ५०० प्रयोग पूर्ण झाले. असा आगळावेगळा विक्रमी प्रयोग करणारा तो एकमेव कलाकार आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक म्हणून प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासोबतच शास्त्रीय गायनासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल आरती अंकलीकर टिकेकर यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या दोघांनाही २०२० सालचा पुरस्कार जाहीर झाला, तर ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मीना नाईक यांना २०२० सालचा पपेट्रीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणा-या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे.