no images were found
मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा: स्नेहा टोणपे
कोल्हापूर,: मातृदेवतांमध्ये संस्कृती वाटचालीच्या पाऊलखुणा असतात, असे प्रतिपादन लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. स्नेहा टोणपे यांनी नुकतेच केले. त्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात ‘शोध मातृदेवतांचा’ या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
मातृदेवतांचे एकूणच व्यापक स्वरूप जटील आणि व्यामिश्र स्वरूपाचे असल्याचे सांगून डॉ. टोणपे म्हणाल्या, शेती, जल, संस्कृतीची विविध रूपे मातृदेवतांत दिसून येतात. त्याचप्रमाणे संस्कृती उत्क्रांतीच्या अनेक पाऊलखुणाही त्यांच्यामध्ये आढळतात.
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मातृदेवतांची चिकित्सा करणे आणि मातृदेवतांच्या अभ्यासाकडे आजच्या संशोधक विद्यार्थ्यांनी नवदृष्टीने पाहिले पाहिजे. मानवी अस्तित्वाच्या अनेक खुणा मातृदेवतांच्या अभ्यासातून शोधता येतात. तसा दृष्टीकोन ठेवून संशोधन विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नंदकुमार मोरे प्रमुख उपस्थित होते. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.