Home आरोग्य टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

1 min read
0
0
5

no images were found

टीबीमुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

           मुंबई,  : ‘क्षयरोग (टीबी) हा केवळ वैद्यकीय विषय नसून समाजापुढील आर्थिक आणि सामाजिक आव्हान आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर तपासणी, नियमित उपचार आणि व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून ‘टीबीमुक्त मुंबई’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ घडविण्यासाठी लोकचळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

            मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नारायण गुरु महाविद्यालय, चेंबूर येथे आयोजित ‘टीबीमुक्त मुंबई’ जनजागृती पदयात्रेला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आयोजित या अभियानात हजारो एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले.

            राज्यपालांनी उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत श्री नारायण गुरु यांच्या विचारांचे स्मरण केले. “मानवतेसाठी एक जात, एक धर्म आणि एक ईश्वर” हा त्यांचा संदेश आजही समाजाला समानता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. टीबीविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि परिसरातील दोन कोटी नागरिकांपर्यंत टीबीविषयी योग्य माहिती पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरुणांनी शॉर्ट फिल्म्स, पोस्टर्स, पॉडकास्ट आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून टीबीमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी यशोगाथा समाजापर्यंत पोहोचवाव्यात. चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांनीही सामाजिक जबाबदारी स्वीकारून या अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

            राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी टीबीबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याची गरज अधोरेखित केली. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, शासनाकडून टीबीवरील उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टीबीग्रस्त रुग्णांशी भेदभाव न करता त्यांच्याशी सहानुभूती, सन्मान आणि सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            झोपडपट्ट्या आणि संवेदनशील वस्त्यांमध्ये जनजागृतीचे अभियान अधिक व्यापक करण्याची आवश्यकता मुंबई विद्यापीठाचे एनएसएस स्वयंसेवक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा टीबी सेल, भामला फाउंडेशन, आरोग्य कर्मचारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विशेष कौतुक केले.

            “ही पदयात्रा केवळ जनजागृतीचा कार्यक्रम नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. शासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य यंत्रणा, विद्यार्थी, कलाकार आणि सामान्य नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ हे राष्ट्रीय ध्येय निश्चितपणे साकार होईल,” असा विश्वास राज्यपाल जिष्णु  देव वर्मा यांनी व्यक्त केला.

चित्रपटातील संवादाच्या शैलीत जनजागृती- राकेश बेदी

      अभिनेते राकेश बेदी यांनी चित्रपट संवादाद्वारे टीबीविरुद्धचा लढा मांडला. ते म्हणाले, “टीबीपासून घाबरण्याची अजिबात गरज नाही! टीबीला आपण ठणकावून सांगू शकतो – ‘ए टीबी, तू आमचं काहीही बिघडवू शकत नाहीस… कारण मुलं आमची आहेत!'” या संवादाला उपस्थितांनी आणि विशेषतः मुलांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला.

मुंबईकर नेहमीच लढण्यासाठी सज्ज!- शिव ठाकरे

      अभिनेते शिव ठाकरे यांनी सांगितले की,”मुंबईकर हे नेहमीच प्रत्येक संकटाशी आणि आजाराशी लढा देण्यासाठी तत्पर असतात. ‘टीबी मुक्त मुंबई’ या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल भामला फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार.

            यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ भामला, प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटाचलम, एनएसएसचे विशेष कार्य अधिकारी सुनील शिंदे, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच हजारो एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम; मूतखड्याची कारणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सविस्तर चर्चा

भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम; मूतखड्याची कारणे, …