no images were found
२८ महिलांवर ११५वेळा लैंगिक अत्याचार; ब्रिटनमध्ये भारतीय डॉक्टरला जन्मठेप
लंडन: ब्रिटनमध्ये जलेबी बाबासारखं प्रकरण समोर आलं आहे. २८ महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यानं भारतीय वंशाच्या डॉक्टरला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मूळचा भारतीय असलेल्या ब्रिटिश डॉक्टरविरोधात लैंगिक अत्याचाराचे ११५ गुन्हे दाखल झाले. मनीष शाह असं डॉक्टरचं नाव असून तो ५३ वर्षांचा आहे.
ओल्ड बेलीचे (इंग्लंड आणि वेल्सचं केंद्रीय गुन्हेगारी न्यायालय) न्यायमूर्ती पीटर रूक यांनी शाहला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शाह महिलांसाठी धोकादायक असल्याचं रुक निकाल देताना म्हणाले. आपल्या पदाचा गैरवापर करत शाह महिलांच्या योनीचं, स्तनांचं, अंतरंगाचं परीक्षण करायचा. या परिक्षणांची काहीच गरज नसतानादेखील शाह या गोष्टी करत होत्या, अशी माहिती फिर्यादी रील केर्मी-जोन्स केसी यांनी कोर्टाला दिली. महिला रुग्णांना या चाचण्यांना तयार करण्यासाठी डॉ. शाहनं एँजेलिना जोली आणि जेड गुडी यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणं दिली.
मनीष शाह प्रसिद्ध डॉक्टर आहे. त्याच्या अपॉईंटमेंटच्या वेळा सहजासहजी मिळायच्या नाहीत. मात्र प्रत्यक्षात त्यानं महिलांशी छेडछाड केली, गैरवर्तन केलं. यातील काही पीडितांनी न्यायालयात साक्ष दिली. डॉ. शाह आपल्याला ‘स्टार’, ‘विशेष तरुणी’ आणि ‘लाडकी’ म्हणायचे, अशी माहिती पीडितांनी न्यायालयाला दिली. शाहनं मात्र सर्व आरोप फेटाळून लावले. पोलीस तपास सुरू झाल्यावर २०१३ मध्ये शाहला वैद्यकीय प्रॅक्टिसमधून निलंबित करण्यात आलं होतं. फेब्रुवारी २०२० मध्ये त्याला दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये २४ महिलांविरोधात ९० गुन्ह्यांप्रकरणी १५ वर्षांचा कारावास आणि तीन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १५ ते ३४ वर्ष वयोगटातील २८ महिलांसोबत करण्यात आलेल्या ११५ गुन्ह्यांबद्दल शाहला दोषी ठरवण्यात आलं.