no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘झोटेरो विथ एआय’ विषयावर विशेष व्याख्यान संपन्न
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘मिडिया अँड कम्युनिकेशन क्लब’ अंतर्गत ६३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “Zotero with AI: Smarter Reference Management for Academic Research” या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गुजरात केंद्रीय विद्यापीठाचे सहाय्यक ग्रंथपाल व विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. भावेश पटेल हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आपले मार्गदर्शन करताना डॉ. पटेल यांनी शैक्षणिक संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘झोटेरो’ सारख्या संदर्भ व्यवस्थापन साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. सुतार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संशोधकांनी बदलत्या डिजिटल युगात नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. मुख्य वक्त्यांचा परिचय डॉ. वाय. जी. जाधव यांनी करून दिला. व्याख्यानानंतर झालेल्या शंका-निरसन सत्राचे संचालन उपग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस. व्ही. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती सुकेशानी कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. विनोद गुरव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवाजी जाधव, प्रा. निशा मुढे-पवार आणि प्रा. अक्षय सरवदे यांचे विशेष सहकार्य लाभले. या व्याख्यानाला विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने उपस्थित होते.