
no images were found
कोल्हापुरात खोलखंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ
कोल्हापूर : शनिवार पेठ येथील पुरातन खोल खंडोबा मंदिरात गुरुवारी चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ झाला. सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी खंडोबाचा जागर तर मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी मुख्य चंपाषष्ठी उत्सव आहे. उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी केली असून विद्युत रोषणाईही करण्यात आली. उत्सवकाळात अभिषेक, भजन, वाघ्या मुरळीचा जागर अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
खंडोबा मंदिराची उभारणी विजापूरच्या गोलघुमटासारखी असून कोणत्याही खांबाचा आकार न घेता मंदिराच्या गाभाऱ्यापासून घुमटापर्यंत चाळीच फूटाची उंची आहे. या मंदिराची नोंद पुरातत्व खात्याकडेही झाली आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरात वीस फूट खाली उतरावे लागते. ओबडधोबड दात्रे पध्दतीच्या १६ पायऱ्यावरुन थेट गाभाऱ्यात जावे लागते. गाभाऱ्याच्या मध्यभागी शिवलिंग असून त्यासमोर चबुतऱ्यावर म्हाळसा देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या तीनही बाजूस मोठ्या दिवळ्या असून त्यामध्ये भालदार, चोपदारांची देवळे म्हटले जाते. मंदिराच्या पश्चिमेला दगडी कमान आहे.
गुरुवारी सकाळी शिवलिंगास अभिषेक करुन ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’च्या जयघोषात तळी उचलण्याचा कार्यक्रम झाला. मंगळवारी चंपाषष्ठी उत्सव असून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री खोल खंडोबा देवस्थान ट्रस्टचे खंडेराव बापूसाहेब जगताप यांच्या अधिपत्याखाली घनश्याम जगताप,मेघश्याम जगताप हे सोहळ्याचे नियोजन करत आहेत.