
no images were found
शाहू महाराजांची छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपूर्ण प्रदर्शन –भगवान कांबळे
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणासाठी अविरतपणे झटले. शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्ष्मी विलास पॅलेस येथील दुर्मिळ कागदपत्रे व छायाचित्र प्रदर्शन माहितीपूर्ण असून या प्रदर्शनाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त कोल्हापूर वस्तुसंग्रहालय (पुरातत्व विभाग) व पुरालेखागार (पुराभिलेखागार संचालनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्रे व दुर्मिळ कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट तर माहिती अधिकारी वृषाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी सहायक अभिरक्षक उदय सुर्वे, पुराभिलेख विभागाच्या सहायक संचालक रुपाली पाटील, पुराभिलेखाधिकारी गणेश खोडके, उत्तम कांबळे प्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात भरीव कार्य केले. याबरोबरच त्यांनी सहकार, उद्योग, शिक्षण क्षेत्रासह सामाजाच्या विकासासाठी अनेकविध कायदे केले. जातीभेद निर्मूलन, घटस्फोटास व विधवा पुर्नविवाहास कायदेशीर मान्यता, स्त्रियांच्या संरक्षणाचा कायदा, अस्पृश्यतेला प्रतिबंध, सरकारी नोकरीत आरक्षण असे सामाजिक बदलासाठी त्यांनी तयार केलेले कायदे आजही मार्गदर्शक आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याची महती विषद करणारे हे छायाचित्र, दुर्मिळ कागदपत्रे व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन विद्यार्थी, पालकांसह इतिहास अभ्यासकांसाठीही माहितीपूर्ण आहे. शाहू महाराजांचे विचार व कार्य कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी असे प्रदर्शन ग्रामीण भागात देखील आयोजित करणे आवश्यक आहे.
माहिती अधिकारी वृषाली पाटील म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांच्या महान कार्यामुळेच जगभरात कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. राजा असूनही जनकल्याणाच्या कार्याला वाहून घेत ते ऋषीतुल्य जीवन जगले. यासाठी कोल्हापूर संस्थानात त्यांनी विधवा पुर्नविवाहासह महिलांसाठी अनेक कायदे व सोयी सुविधा निर्माण केल्या. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करुन शैक्षणिक हित साधले. राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षामध्ये आयोजित केलेले हे प्रदर्शन सर्वांना उपयुक्त ठरेल. यावेळी अर्चना शिंदे यांच्यासह वस्तू संग्रहालय व पुरालेखागार कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.