no images were found
व्यसनासाठी पैसे न दिल्याने कुटुंबातील चौघांची हत्या
नवी दिल्ली : व्यसनासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने वडील दिनेश (वय ५०), आई दर्शना (४५), बहिण उर्वशी (१८) आणि आजी दीवाना देवीची (वय ७५) धारदार शस्त्राने हत्या केली. व्यसनाधीन तरुणाने त्याच्याच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील पालम परिसरात घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी केशवला (वय २५) अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी; आरोपी केशव हा व्यसनाधीन होता. त्याचे व्यसन सोडवण्यासाठी कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच कुटुंबियांनी त्याला घरी आणले होते. परंतु, व्यसनमुक्ती केंद्रात देखील त्याचे व्यसन सुटले नव्हते. व्यसन करण्यासाठी तो कुटुंबियांच्या मागे पैशांचा तगादा लावायचा. मंगळवारी देखील त्याने व्यसनासाठी कुटुंबियांकडे पैसे मागितले. परंतु, घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने केशवने त्यांची हत्या केली. हत्येनंतर पसार होण्याच्या तयारीत असताना आरोपीला इतर लोकांच्या मदतीने त्याच्या चुलत भावाने पकडले.
रात्री साडे दहाच्या सुमारास केशवच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. काही वेळानंतर केशवच्या चुलत भावाने बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. यानंतर तो आजूबाजूच्या लोकांना घेवून घरी पोहचला. परंतु, आरोपीने दरवाजा आतून बंद केला होता. यावेळी घराचे दार ठोठावल्यानंतर केशवने हे घरघुती भांडण असल्याचे सांगितले. लोकांनी त्यामुळे काही वेळ वाट बघितली. परंतु, अचानक आरोपी पळू लागला, तेव्हा लोकांनी त्याला पकडले. लोकांनी जेव्हा घरी जाऊन बघितले. तेव्हा घराची फरशी रक्ताने माखली होती. आजूबाजूला चार मृतदेह पडले होते. व्यसनाधीन मुलाने व्यसनाच्या आहारी जात अवघे कुटुंब संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.