no images were found
ठाकरेंच्या शिवसेनेसमोरील खरे आव्हान नेतृत्वशैलीचे-हेमंत पाटील
पुणे,(प्रतिनिधी):-राज्यात वेगाने बदलत चाललेल्या राजकीय पटावर शिवसेनेला (उबाठा) तग धरून राहायचे असेल, तर नेतृत्वशैली बदलाचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. केवळ मतदारांना भावनिक करून चालत नाही; तर प्रत्यक्षात जमिनीवर उतरून सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना दाखवून द्यावे लागेल. आपला पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी ठाकरेंनी हे करून दाखवावे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.२९) व्यक्त केले.
ठाकरे यांनी नुकतेच वाशीम येथील जाहीर सभेतून डॉ.सिद्धार्थ देवळे यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांनी आतापासूनच राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवारांची यादी जाहीर केली, तरी जोपर्यंत ते आपल्या कार्यशैलीत बदल करत नाहीत, तोपर्यंत पक्षातील गळती थांबणार नाही, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
पक्षाचा कार्याध्यक्ष हा घराणेशाहीच्या चौकटीबाहेरचा, तळागाळातून घडलेला आणि सामान्य शिवसैनिक असावा. ज्या सामान्य कार्यकर्त्यांच्या रक्ताघामावर शिवसेना मोठी झाली, त्यांना आता नेतृत्वाच्या पहिल्या फळीत स्थान मिळायला हवे. अशा कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी दिल्यास पक्षात नवचैतन्य निर्माण होऊ शकते. शिवसैनिकांना योग्य सन्मान, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि वेळ मिळाला नाही, तर पक्षातील गळती थांबणार नाही. त्यामुळे संघटनात्मक पुनर्बांधणी आणि कार्यकर्ताकेंद्रित नेतृत्व हीच काळाची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विद्यमान राजकीय धोरणात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तृणमूल काँग्रेसप्रमाणे अंतर्गत विस्कळीतपणाचा धोका शिवसेनेसमोर उभा आहे. त्यामुळे नेतृत्वातील बदल, विचारधारेला प्राधान्य, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि संघटनात्मक बळकटी हेच शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार असल्याचे पाटील म्हणाले.