no images were found
गौतम अदाणी यांनी ‘वंदे भारतम्’ उपक्रमाची सुरुवात केली; देशभरातील उद्योजकांचा शोध घेणार
देशभरातील तळागाळातील उद्योजक आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार व्यासपीठ
- ‘वंदे भारतम्’ उपक्रमांतर्गत देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 800 हून अधिक जिल्ह्यांमधील नवोन्मेषक, उद्योजक आणि समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.
- विविध टप्प्यांतील निवड प्रक्रियेनंतर 75 अंतिम स्पर्धकांची निवड केली जाईल. त्यांना अहमदाबाद येथे विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या उपक्रमाचा राष्ट्रीय ग्रँड फिनाले स्वातंत्र्य दिनाच्या आसपास आयोजित केला जाईल.
- हा उपक्रम केवळ मोठ्या स्टार्टअप शहरांपुरत्या मर्यादित नसून, देशातील विविध भाग, क्षेत्रे, भाषा आणि समुदायांमधील उद्योजकीय प्रतिभेला संधी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
अहमदाबाद, : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी त्यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त ‘वंदे भारतम्’ या राष्ट्रीय उपक्रमाची आज घोषणा केली. या उपक्रमाचा उद्देश देशभरातील नवोन्मेषक, उद्योजक आणि विविध समस्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.
हा उपक्रम देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 800 हून अधिक जिल्हे आणि विविध भारतीय भाषांपर्यंत पोहोचणार आहे. सर्व वयोगटांतील आणि विविध पार्श्वभूमीतील नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. भारतातील पारंपरिक स्टार्टअप केंद्रांबाहेरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकीय प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आज भारत जगातील प्रमुख स्टार्टअप परिसंस्थांपैकी एक मानला जातो. मात्र, अजूनही 80 टक्क्यांहून अधिक स्टार्टअप संस्थापक केवळ पाच प्रमुख शहरांतून पुढे येतात. त्यामुळे अनेक होतकरू नवोन्मेषकांना आपली क्षमता दाखवण्याची, मार्गदर्शन मिळवण्याची आणि योग्य संपर्क निर्माण करण्याची संधी मिळत नाही.
‘वंदे भारतम्’ या उपक्रमाद्वारे ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे महानगरे, उदयोन्मुख शहरे, लहान शहरे आणि ग्रामीण भागातील अशा व्यक्तींचा शोध घेतला जाईल, ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना, उपाययोजना किंवा उद्योगांमुळे आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.
भारत 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, उद्योजकता आणि नवोन्मेष क्षेत्रात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवणे हे आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या उपक्रमात वय, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता किंवा व्यवसायाच्या टप्प्याची कोणतीही अट नाही. ज्यांच्याकडे एखादी नवीन कल्पना, नाविन्यपूर्ण शोध, समस्या सोडविण्याचा उपाय किंवा उद्योजक होण्याची इच्छा आहे, ते सर्वजण यात सहभागी होऊ शकतात. सहभागी व्यक्ती संकल्पना, प्रोटोटाइप, प्रारंभिक टप्प्यातील उद्योग किंवा आधीपासून सुरू असलेला व्यवसाय यांसह अर्ज करू शकतात. यासाठी स्टार्टअपची नोंदणी असणे आवश्यक नाही.
तंत्रज्ञान, उत्पादन, शाश्वत विकास, शेती, पारंपरिक हस्तकला आणि समुदायाच्या सहभागातून विकसित होणारे उपाय अशा विविध क्षेत्रांमधून अर्ज मागविण्यात येणार आहेत. महिला उद्योजक, आदिवासी उद्योजक, ग्रामीण भागातील नवोन्मेषक, दिव्यांग उद्योजक आणि स्थानिक समस्यांवर काम करणाऱ्या समुदायाधारित नवोन्मेषकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विशेष प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध करून दिली जाईल.
अर्जांची निवड एका निश्चित आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल. यात नावीन्य, उद्योजकीय क्षमता, सामाजिक व आर्थिक परिणाम आणि विस्ताराची क्षमता या निकषांवर मूल्यांकन केले जाईल. मूल्यांकनाचे निकष, परीक्षक मंडळ आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल.
राज्य आणि प्रादेशिक स्तरावरील निवडीनंतर 75 अंतिम स्पर्धकांची निवड केली जाईल. या स्पर्धकांना अहमदाबाद येथे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन (मेंटॉरशिप), उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद तसेच गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेत्यांशी भेटीगाठी यांचा समावेश असेल. हे 75 स्पर्धक देशातील विविध प्रदेश, क्षेत्रे आणि समुदायांचे प्रतिनिधित्व करतील.
उपक्रमाची घोषणा करताना गौतम अदाणी यांनी सांगितले, “मी माझा प्रवास सुरू केला तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. आज मी जे काही आहे आणि जे काही यश मिळवले आहे, ते भारतभूमीने मला दिले आहे. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, परंतु संधी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या नाही.”
भारताने जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप परिसंस्थांपैकी एक उभारली आहे. मात्र, आजही बहुतांश स्टार्टअप उद्योजक काही मोजक्या शहरांमधूनच पुढे येतात. ‘वंदे भारतम्’ हा उपक्रम अशा नवोन्मेषक, समस्या सोडविणाऱ्या व्यक्ती आणि उद्योजकांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, ज्यांच्या कल्पनांना ओळख, पाठबळ आणि मोठे व्यासपीठ मिळण्याची गरज आहे. देश घडवण्याचे धाडस आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द असलेल्या प्रत्येक भारतीयाला या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवड झालेल्या अंतिम स्पर्धकांना मार्गदर्शक तज्ज्ञ (मेंटर्स), गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील नेते, इन्क्युबेशन सुविधा आणि धोरणात्मक भागीदारी यांचा लाभ मिळेल. यामुळे त्यांच्या कल्पनांचे यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर होण्यास मदत होईल. या कार्यक्रमात रोख पारितोषिके आणि विविध श्रेणींमधील विशेष पुरस्कार देखील दिले जाणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती नंतर जाहीर करण्यात येईल.
स्वातंत्र्य दिनाच्या आसपास आयोजित करण्यात येणारा ग्रँड फिनाले हा केवळ स्पर्धेचा शेवट नसून, सहभागी व्यक्तींना मार्गदर्शक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर नवोन्मेषक यांना एकत्र जोडणाऱ्या दीर्घकालीन व्यासपीठाची सुरुवात असेल.
गौतम अदाणी यांनी पुढे सांगितले, “जर मी हे करू शकलो, तर कोणताही भारतीय हे करू शकतो. त्यासाठी फक्त एक संधी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज आहे. देशातील प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेश, 800 हून अधिक जिल्हे तसेच जगभरातील भारतीय समुदायापर्यंत पोहोचणारा ‘वंदे भारतम्’ हा उपक्रम भारतातील उद्योजक आणि नवोन्मेषकांचा शोध घेण्यासाठी सर्वात व्यापक व्यासपीठांपैकी एक बनण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
या उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया 24 जूनपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार vandebharatam.org या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.