no images were found
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता व वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कार
२९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र ; नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा किट, लाड-पागे शिफारशीनुसार ३ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश
कोल्हापूर, : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर पहिलाच कार्यक्रम म्हणून महापालिकेच्या स्वच्छता व वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखात पार पडला. महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘नमस्ते योजने’अंतर्गत कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ३ नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश यावेळी सुपूर्द करण्यात आले.
महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. अनेक वर्षांपासून बंद असलेली जुनी वाहने व स्क्रॅपमधील चार ट्रक अतिक्रमण कारवाईसाठी तयार करणे तसेच जुना जेसीबी दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या १२ कर्मचारी व सुपरवायझरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार अधिकारी राम काटकर व वर्षा जोशी यांनी केले
यावेळी महापौर सौ.रुपाराणी निकम म्हणाल्या, नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर पहिलाच कार्यक्रम स्वच्छता दूतांच्या सन्मानासाठी होत असल्याचा आनंद आहे. संपूर्ण शहर झोपेत असताना महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आपल्या कामाला सुरुवात करतात. ऊन, पाऊस, थंडी, सण-उत्सव यांचा विचार न करता ते शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
कर्मचारी वर्गासाठी विविध योजना राबविण्याचा विचार असल्याचे सांगून महापौर म्हणाल्या, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मुलांसाठी दरमहा ३ हजार ५०० रुपये, शिष्यवृत्ती योजना तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याबाबत नियोजन करू. कर्मचाऱ्यांच्या नोकरी संदर्भातील प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक घेऊन ते मार्गी लावण्यात येतील. कर्मचाऱ्यांच्या काही गरजा अथवा अडचणी असल्यास त्यांनी त्या आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले, “ज्यांच्यामुळे कोल्हापूर शहर स्वच्छ आणि निरोगी आहे, ते आपले स्वच्छता दूत आहेत.” संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्यानंतर पहिला कार्यक्रम महापालिकेतील सर्वात महत्त्वाच्या घटक असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घेण्याचा निर्णय घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना शोभेल असा हा क्षण आहे. त्यांनी कधीही जात-पात, धर्म-पंथ किंवा उच्च-नीच असा भेद केला नाही. काम हे काम असते आणि प्रत्येक कामाचा सन्मान झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यांत जवळपास ६७ कर्मचाऱ्यांना लाड-पागे योजनेंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. पदवीधर झालेल्या कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ५० लाख रुपयांचे साडी व खादी कापडाचे वाटप करण्यात आले असून गमबुटांचेही वितरण करण्यात आले आहे.
“कोल्हापूर शहर स्वच्छ आहेच; मात्र ते आणखी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या प्रभागात काम करताना कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे. शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे नाव अभिमानाने घेतले जावे, यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असेही आयुक्त डॉ. भारुड यांनी सांगितले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच नूतनीकरण झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा हा पहिला कार्यक्रम होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगून या ऐतिहासिक क्षणाची नोंद इतिहासात घेतली जाईल, असेही आयुक्तांनी नमूद केले.
या कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ. दीपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, क्रीडा सभापती विजयसिंह खाडे-पाटील, आरोग्य विशेष समिती उपसभापती वैभव माने, गटनेता आदिल फरास, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, कामगार अधिकारी राम काटकर, अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच महापालिकेचा अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.