no images were found
आमदार राजेश क्षीरसागर यांचा आवाज विधिमंडळात घुमणार; अधिवेशनात कामकाजाच्या पहिल्याच दिवशी आमदार क्षीरसागर यांचे तब्बल ६ तारांकित प्रश्न
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनास आज सुरवात झाली असून, विधीमंडळाच्या प्रश्नोतराच्या कामकाजास उद्या दि.२३ पासून सुरवात होणार आहे. पावसाळी अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवरून विधिमंडळात आवाज उठवणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे तब्बल ६ तारांकित प्रश्न मंजुरीसाठी पटलावर आले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने राज्यात अंमली पदार्थांची विक्री व सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, याबाबत ते विधिमंडळात आक्रमक भूमिका मांडणार आहे. त्याचबरोबर राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करणे, अमरावती, कोल्हापूर व वर्धा जिल्ह्यात तरुणींचे अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर प्रसारित होणे, मुंबईतील घाटकोपर परिसरात पोलीस पथकावर जमावाने केलेला हल्ला, नाशिक येथे बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अत्याचार व धर्मांतर केल्याची घटना, नरसापूर (ता.भोर, जि.पुणे) येथील अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खुनाची घटना याबाबतीत तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांची आक्रमक शैली उद्या पुन्हा विधीमंडळात पहायला मिळेल.