
no images were found
पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू, तरुणीवर उपचार सुरू!
औरंगाबादः औरंगाबादमध्ये काल घडलेल्या घटनेतील तरुणाचा अखेर मृत्यू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली होती. तरुणीचा लग्नास नकार असल्याने तरुणाने स्वतःसोबत त्या तरुणीलाही पेटवून दिले होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून पूजा साळवे आणि गजानन मुंडे या दोघांच्यामध्ये मैत्री होती. मात्र काही दिवसांपूर्वी गजानन मुंडे याच्याविरोधात तिने पोलिसात तक्रार दिली होती. याचा राग धरून गजाननने हे कृत्त्य केले असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु रात्री ११ वाजता या तरुणाची प्राणज्योत मालवली. तसेच तरुणीवर अजूनही उपचार सुरु आहेत.
ही तरुणी पीएचडी करीत होती. प्रयोगशाळेत ती शिक्षिकेशी बोलत असताना त्यावेळी गजानन त्याठिकाणी आला. त्याने प्रयोगशाळेचा दरवाजा लावला. बॅगमधून आणलेल्या बाटलीतून आधी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि त्यानंतर पूजाच्या अंगावरही टाकले.. त्यानंतर ‘माझ्याशी लग्न का करत नाहीस,’ असे म्हणत लायटरने स्वतःला पेटविले आणि पूजाला मिठी मारली. हे दृश्य पाहून शिक्षिकेने आरडाओरड केली. कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी धावत येत अग्निप्रतिरोध यंत्राच्या मदतीने आग विझवली. परंतु तोपर्यंत दोघेही गंभीररित्या भाजले होते. या दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री 11 वाजता गजाननची प्राणज्योत मालविली.