
no images were found
कोल्हापूरात अग्निवीर सैन्य भरती सुरु
कोल्हापूर : मंगळवारपासून (दि. 22) होणाऱ्या अग्निवीर सैन्य भरतीसाठी मोठ्यासंख्येने तरुण शहरात दाखल झालेले आहेत. एक दिवस आधीच (सोमवार दि.२१) तरुण राजाराम कॉलेजच्या मैदानावर जमा झाल्याचे दिसते. सध्या थंडीचा जोर वाढता असूनही सैन्य दलात भरती होण्यासाठी आलेल्या या जवानांनी रात्र मैदानावरच थंडीत काढली. पहिल्या दिवशी मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील भरती प्रक्रिया होईल.
या अग्निवीर भरतीसाठी ९८ हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. राजाराम कॉलेज मैदानावरून भरती प्रक्रियेस सुरुवात होईल. शारीरिक चाचणी शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर होइल. या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने भरती प्रक्रिया टप्प्याच्या स्वरुपात करण्याचा निर्णय सैन्य दलाने घेतला असून ही भरती प्रक्रिया 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. तालुकानिहाय रोज पाच हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलविण्यात आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा आदी ठिकाणच्या तरुणांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत.
मोफत अन्नछत्र – भरतीसाठी येणार्या तरुणांसाठी ‘व्हाईट आर्मी’ या संस्थेने मोफत अन्नछत्राची सोय केली आहे. दररोज हे अन्नछत्र सुरू राहणार आहे.
पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था- भरतीसाठी येणार्या तरुणांसाठी महापालिकेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली आहे. शहरातील रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेत प्रशासनाने यावेळी मैदानातच सर्व भरती प्रक्रियेची व्यवस्था केली आहे.
कडेकोट पोलिस बंदोबस्त- अग्निवीर सैन्य भरती पहिल्यांदाच होत असल्याने कोणत्याही अडथळ्याशिवाय ही भरती प्रक्रिया पूर्ण शांततेत पार पडावी म्हणून प्रशासनाने सायबर चौकापासून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.