no images were found
वाघाचा नागपूर शहरभागात शिरकाव; नागरिक भयभीत
नागपूर : जवळ जवळ महिन्याभरापासून नागपूर मध्ये शहराबाहेर आढळणाऱ्या वाघाचे आता शहरात दर्शन झाल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. हा वाघ पट्टेदार असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असून रोज गाय, बैल लक्ष्य करीत असल्याने दहशत वाढली आहे. परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. हा वाघ दररोज आपले ठिकाण बदलत असल्याने वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित हालचाली करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या या वाघामुळे आसपासच्या गावांमध्ये दहशतीचे निर्माण झाली आहे. पोलिसांकडून वनविभागाला सर्व माहिती देण्यात आली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करण्यासह वाघाला पडकून इतरत्र हलविण्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.
या वाघाने आत्तापर्यंत शेतात बांधून ठेवलेल्या एका बैलाला ठार मारले आहे. नागरी वस्त्यांमध्ये वाघाचा वावर असल्यामुळे चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी गावकरी रस्त्यांवरून जाण्यासही घाबरत आहेत. या वाघाने मागील महिन्यात अनेक जनावरे गंभीर जखमी केली असून ती जनवरे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. रोजच काही ठिकाणी अशा घटना घडल्याचे समजते. रविवारी परोडा ते रूई मार्गावर गावालगतच्या खासगी शाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चौकीदाराला पट्टेदार वाघ दिसला. अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा या वाघाने बळी घेतलेला आहे. आशिष मेश्राम यांच्या शेतात वाघाने एका बैलाला ठार मारले. त्यांच्या शेतात 2 बैल, 1 गाय, वासरू बांधून होते. त्यापैकी एका बैलाची शिकार करून वाघाने त्याला शेताबाहेर ओढत नेले. रविवारी सकाळी पेवठा ते वेळाहरी रोडवरील एका शेतकऱ्याला पिल्लासह वाघ दिसला. तरी वनविभागाने वाघास जेरबंद करण्यासाठी त्वरित हालचाली करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.