no images were found
‘गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- महाराष्ट्राची ओळख असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाने धर्माधारित ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे हलाल प्रमाणपत्र तत्काळ रद्द न केल्यास उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच वेळ पडली, तर थेट ‘गोकुळ’वर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिला आहे. या मागणीचे सविस्तर निवेदन संघटनांच्या प्रतिनिधींनी गोकुळचे प्रशासकीय मंडळाला, तसेच कोल्हापुरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार श्री. अशोक माने यांना दिले. एका धर्मनिरपेक्ष देशात शासकीय प्रमाणपत्रांना डावलून घेतलेल्या या निर्णयामुळे बहुसंख्य हिंदू ग्राहकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन हे प्रमाणपत्र रहित करावे, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी कार्यकत्यांनी गोकुळच्या हलाल प्रमाणपत्राची प्रत जाळली.
आखाती देशांमध्ये उत्पादने निर्यात करण्यासाठी या प्रमाणपत्राची सक्ती असल्याचे कारण गोकुळ प्रशासनाकडून दिले जात असले, तरी हा अट्टाहास पूर्णतः अनाकलनीय आहे. देशांतर्गत आणि राज्यातच गोकुळच्या दुधाला मोठी मागणी असतांना अद्याप संपूर्ण भारतात दूध पोहोचले नसताना केवळ मुस्लिम देशांनाच उत्पादने विकण्याची घाई का केली जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) यांसारख्या अधिकृत शासकीय संस्था अस्तित्वात असताना वेगळ्या धर्माधारित प्रमाणपत्राची आवश्यकताच काय? हा देशाच्या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा आणि शासकीय संस्थांचा अवमान आहे. हलाल प्रमाणपत्र हे बेकायदेशीर असल्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घातलेली आहे.
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशात एक अत्यंत घातक आणि समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे, हे प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा हिंद’ ही संस्था यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर जिहादी आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी करते. त्यामुळे गोकुळचे दूध पिणाऱ्या हिंदू ग्राहकांचा कष्टाचा पैसा अप्रत्यक्षरीत्या देशविघातक कारवायांसाठी आणि आतंकवाद्यांच्या सुटकेसाठी वापरला जाणार का? जर हे दूध ‘हलाल’ प्रमाणित असेल, तर त्यासाठी बहुसंख्य हिंदूंनी आपला पैसा का मोजावा? या राष्ट्रीय धोक्याची गांभीर्याने दखल घेत हे प्रमाणपत्र तत्काळ रद्द करावे आणि ज्या तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाच्या काळात हा निर्णय झाला त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या वेळी गोकुळच्या प्रशासकांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. या गंभीर विषयावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कोल्हापुरातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
या वेळी या शिष्टमंडळात महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रमसिंह जरग, सामाजिक कार्यकर्ते श्री. शशी बीडकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, बजरंग दलाचे श्री. प्रतिक कुलकर्णी, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि सौ. साधना गोडसे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. किरण कुलकर्णी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, शहराध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, श्री. श्रीकांत जाधव, ‘पॉझिटिव्ह वॉच’चे श्री. शेखर धोंगडे, मानवाधिकार संघटनेचे श्री. राजेश वाघमारे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुयोग काकतकर आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे आदी मान्यवरांनी एकत्र येत ही प्रखर भूमिका मांडली.