Oplus_131072
no images were found
डॉ. प्रीती अदाणी यांनी मुंद्रा येथील अदाणी पब्लिक स्कूलच्या 25 वर्षांचा प्रवास साजरा केला
मुंद्रा : अदाणी पब्लिक स्कूल (एपीएस), मुंद्रा यांनी तरुण विद्यार्थ्यांना घडवण्याच्या प्रवासात 25 वर्षे पूर्ण केली असून, सिल्व्हर ज्युबिली निमित्ताने एक भावनिक आणि आनंददायी कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि अभिमानाचा क्षण एकत्र अनुभवला. या प्रसंगी कच्छमध्ये इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि अत्याधुनिक ऑडिटोरियमचे उद्घाटनही करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळेचा भर अधिक मजबूत झाला.
हा कार्यक्रम अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. अदाणी फाऊंडेशन ही अदाणी समूहाची सामाजिक कल्याण आणि विकास शाखा असून, 2001 साली त्यांच्या कल्पनेतून या शाळेची सुरुवात झाली. प्रकल्प सुरू असतानाच गुजरात भूकंपामुळे कामाला गती मिळाली आणि त्या काळात शिक्षण हे समाजासाठी स्थैर्य आणि आशेचे माध्यम ठरले.
या निमित्ताने अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले, “अदाणी पब्लिक स्कूलचे 25 वर्ष पूर्ण होणे हा फक्त एका संस्थेचा उत्सव नाही, तर अनेक स्वप्नांची पूर्तता आणि भविष्य घडवण्याचा सन्मान आहे. या टप्प्यावर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक विद्यार्थी अमर्याद स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास घेऊन पुढे जाईल, प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवेल आणि समाजाला काहीतरी परत देण्याची विनम्रता जपेल. येथे प्रत्येक मुलामध्ये भारताच्या उज्ज्वल भविष्याची आशा दडलेली आहे आणि हीच आशा आम्हाला अर्थपूर्ण काम करण्यासाठी प्रेरित करते.”
शाळेच्या 25 वर्षांच्या प्रवासाबद्दल डॉ. प्रीती अदाणी म्हणाल्या, “पंचवीस वर्षांपूर्वी कच्छच्या समुद्रकिनाऱ्यावर एक साधी कल्पना रुजली होती. प्रत्येक मुलाला असे शिक्षण मिळावे जे त्याच्यासाठी जगाची दारे उघडेल. छोट्या आशेपासून सुरू झालेला हा प्रवास आज एक तेजस्वी दीप बनला आहे, जो अनेकांचे जीवन आणि समाज उजळवत आहे. हा प्रवास त्या प्रत्येक शिक्षकांचा आहे ज्यांनी विश्वास ठेवला, त्या प्रत्येक पालकांचा आहे ज्यांनी भरोसा दाखवला आणि त्या प्रत्येक मुलाचा आहे ज्याने स्वप्न पाहण्याचे धाडस केले.”
या प्रवासाला मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बॅगपायपर बँड आणि नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या कॅडेट्सच्या पारंपरिक स्वागताने झाली. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) तसेच रोबोटिक्स प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि नाविन्यपूर्ण विचार झळकले. यासोबतच निवडक कला उपक्रम आणि सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांच्या विचार आणि अभिव्यक्तीची संस्कृतीही दिसून आली.
या प्रसंगी इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामध्ये बॅडमिंटन, पिकलबॉल आणि टेबल टेनिस खेळण्यासाठी सुविधा आहेत. तसेच 558 आसन क्षमतेचे अत्याधुनिक ऑडिटोरियमही सुरू करण्यात आले, जे कच्छमधील अशा प्रकारातील मोठ्या ऑडिटोरियमपैकी एक आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे. विशेष तयार केलेल्या डॉक्युमेंटरीद्वारे मुंद्रातील सुरुवातीच्या काळापासून ते आज एक अग्रगण्य संस्था होईपर्यंतचा शाळेचा प्रवास दाखवण्यात आला. तसेच शाळेच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणारे कॉफी टेबल बुकही प्रकाशित करण्यात आले.
सुरुवातीला 233 विद्यार्थी आणि 27 शिक्षकांपासून सुरू झालेली ही शाळा आज 2300 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि 100 हून अधिक शिक्षकांसह एक यशस्वी संस्था बनली आहे. शाळा अजूनही सर्वांगीण शिक्षण आणि समानतेच्या मूल्यांवर ठाम आहे.
या कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे डॉ. अदाणी यांची माजी विद्यार्थी, पालक आणि गुणवंत विद्यार्थ्यांशी झालेली संवाद बैठक, ज्यातून शाळा आणि समाज यांच्यातील मजबूत नातेसंबंध दिसून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या गीताने समारोप झाला. हा उत्सव केवळ एक आनंदाचा क्षण नसून, गेल्या 25 वर्षांत तयार झालेल्या सामूहिक उद्दिष्टाची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा ठरला.