no images were found
‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या टीमने केली नाशिकमधील रामकुंड येथे गोदा आरती
भारतातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाणारी गोदावरी नदी ही श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे. या नदी किनारी केली जाणारी गोदा आरती हा केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा दिव्य अनुभव आहे. मंत्रोच्चार, दीपमाळा आणि आरतीच्या सुरांनी सजलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला शांती आणि समाधान देणारा ठरतो. स्टार प्रवाहच्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील कलाकारांनी नुकतीच याची प्रचिती घेतली. नाशिक येथील रामकुंड येथे पवित्र गोदावरी नदीकिनारी गोदा आरती करून मालिकेच्या यशासाठी कलाकारांनी प्रार्थना केली.
या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, अक्षता अनिता प्रमोद आणि अर्णव वॅरिअर उपस्थित होते. संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात, मंत्रोच्चार आणि आरतीच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता. या दिव्य सोहळ्यात सहभागी होताना कलाकारांनी एक वेगळीच ऊर्जा अनुभवली.
या अनुभवविषयी सांगताना अभिनेते सुनील तावडे म्हणाले, ‘गोदा आरतीचा हा अनुभव अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. मी पहिल्यांदा या पवित्र स्थळी आलो. सोबत एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. मालिकेला असेच आशीर्वाद लाभत राहावेत, हीच प्रार्थना. तेव्हा नक्की पाहा नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’