
no images were found
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा : आ. हसन मुश्रीफ
कोल्हापूर :गावागावातून आणि वाड्या- वस्त्यांतून काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामविकासाच्या गाड्याची चाके आहेत. त्यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजित केलेल्या कृतज्ञतापर सत्कार कार्यक्रमात आ. मुश्रीफ सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
आ. मुश्रीफ ग्रामविकास मंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दुप्पट दराने लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याबद्दल मुश्रीफ यांचा सत्कार व दहा टक्के सेवाजेष्ठता यादीनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
यावेळी आ. मुश्रीफ म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर पाणीपुरवठा, ग्रामसफाई, दिवाबत्ती यासारख्या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी असते. हे काम अक्षरशः २४ तास सुरूच असते. तुलनेत पगार मात्र तोकडा असतो. कोरोनासारख्या महामारीत तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन गावगाडा चालविण्याचे काम केले आहे. अशा या गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन दुप्पट करण्याचे भाग्य मला मिळाले.
यावेळी कागल तालुका सरकारी खरेदी -विक्री संघाचे चेअरमन सूर्याजीराव घोरपडे, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव, भविष्य निर्वाह निधीच्या सल्लागार कविता शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार संजय कांबळे यांनी मानले.