
no images were found
शेतात कांद्याची लागवड करताना वीज कोसळून मुलीचा जागीच मृत्यू
बीड: परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. अनेक पिकं मुसळधार पावसामुळे मातीमोल झाली आहेत. त्यातच परतीचा पाऊस काही ठिकाणी जीवघेणा ठरत आहे. वडवणी तालुक्यातील सत्यवाडीमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेली कुमारी सीमा धर्मराज पवार ही मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शेतात कांदे लागवड करत असताना अचानक मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अवघ्या १४ वर्षांच्या सीमाचा वीज कोसळून मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल सायंकाळच्या वेळी वडवणी तालुक्यातील देवळा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्तेवाडी परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेली कुमारी सीमा धर्मराज पवार ही मुलगी आई-वडिलांसोबत शेतात कांदे लागवड करत असताना तिच्या अंगावर वीज पडून तिचं निधन झालं. तिच्या निधनाने सत्यवाणी परिसरावर शोककळा पसरली.
शेतात कांदा लागवड करत असताना सीमाच्या अंगावर वीज कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सीमा पवार इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये दयानंद माध्यमिक विद्यालय देवळा येथे शिक्षण घेत होती. सीमा अभ्यासात अतिशय हुशार होती. तिच्या अकाली निधनानं कुटुंबासह गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानं अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.