Home कृषि शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज – बसवराज मास्तोळी

शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज – बसवराज मास्तोळी

10 second read
0
0
12

no images were found

शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज – बसवराज मास्तोळी

कोल्हापूर, : शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठ आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि प्रकल्प संचालक ‘आत्मा’ (ATMA), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” या एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी उपस्थितांचे स्वागत करतानाच कृषी विभागाच्या विविध योजना आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचे सविस्तर सादरीकरण केले. श्री. मास्तोळी यांनी आपल्या भाषणात कृषी विभाग, शिवाजी विद्यापीठ, ‘आत्मा’ आणि ‘उमेद’ यांसारख्या संस्थांनी भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी असे संयुक्त कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन केले. याच सत्रात यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेचे प्र. संचालक डॉ. नितीन माळी यांनी ग्रामीण विकास शिक्षणातील संधींचा आढावा घेतला.

       या कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शितल पाटील, डॉ. स्नेहल खांडेकर, डॉ. इराण्णा उडचान, प्रा. डॉ. पी. डी. पाटील आणि सिद्धार्थजी शिंदे लिखित ‘भरड धान्यांचा चमत्कार : स्थानिक धान्ये आणि आधुनिक आश्चर्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. इराण्णा उडचान यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेशजी कुलकर्णी यांनी कृषी क्षेत्राची सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये कृषी क्षेत्राचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व यावर मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रोत्साहित केले.

       कार्यशाळेतील तांत्रिक सत्रांमध्ये तज्ञांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विद्यासागर गेडाम, केव्हीके तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप, आयसीएआर (ICAR) पुणे येथील डॉ. संकेत मोरे, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये येथील कृषी विद्यावेत्ता डॉ. के. व्ही. मालशे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, केव्हीके कणेरीचे डॉ. वावरे आणि शास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये ऊस, भात, सोयाबीन, भाजीपाला व मसाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान, सेंद्रिय कर्ब वाढ, मित्र कीटक, सेंद्रिय कीटकनाशक पद्धती, कुक्कुटपालन आणि अन्नप्रक्रिया उद्योगासह PMFME व कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

       या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील (कोल्हापूर) व किरण पाटील (गडहिंग्लज) यांच्यासह सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचा समारोप प्रभारी कुलगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत झाला आणि शेवटी डॉ. उर्मिला दशवंत यांनी सर्व मान्यवर, मार्गदर्शक तज्ञ व उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In कृषि
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

‘हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाल…