Home कृषि क्यूआर कोडद्वारे खत वितरणास प्रारंभ; जिल्ह्यात FFFS प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद

क्यूआर कोडद्वारे खत वितरणास प्रारंभ; जिल्ह्यात FFFS प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद

2 second read
0
0
5

no images were found

क्यूआर कोडद्वारे खत वितरणास प्रारंभ; जिल्ह्यात FFFS प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर, : केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS) या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे ५ जून रोजी, कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ३१९ खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली.

करवीर तालुक्यातील कोगे येथील मोरे ॲग्रो सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांच्या हस्ते क्यूआर कोड स्कॅन करून शेतकरी उमाजी महादेव निकम आणि मारुती दत्तात्रेय घराळ यांना अनुदानित खतांचे वितरण करण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रणालीची पाहणी केली.

या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) सतीश देशमुख यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच सरपंच वंदना इंगवले, उपसरपंच कृष्णनाथ फडतारे, पोलीस पाटील दत्तात्रय मिटारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FFFS प्रणालीमध्ये ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) आणि आयएफएमएस खत वितरण प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. शेतकरी मोबाईल ॲपच्या माध्यमातून खत बुकिंग करून क्यूआर कोड प्राप्त करतात. हा क्यूआर कोड खत विक्रेत्याकडे स्कॅन केल्यानंतर शेतकऱ्यांना बुक केलेल्या प्रमाणानुसार खतांचे वितरण केले जाते.

या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. खत उपलब्धता, विक्रेत्यांची निवड, बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असून प्रत्येक अनुदानित खताच्या गोणीची नोंद प्रणालीमध्ये राहणार आहे. त्यामुळे खतांचे समन्यायी वाटप होण्यास आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी, खत विक्रेते आणि कृषी विभाग यांच्या समन्वयातून या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून शेतकऱ्यांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In कृषि
Comments are closed.

Check Also

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी

व्हेनेझुएलाच्या  कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्य…