
no images were found
शिंदे गटातल्या खासदाराविरोधात रॅली आधीच निरुपम पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम हे आज बाईक रॅली काढणार होते. पण त्या बाईक रॅलीच्या आधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निरुपम यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
संजय निरुपम यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. “आमचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव आणण्यासाठी मी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. आमचा शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले”.गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदारकीच्या राजीनामा मागण्यासाठी निरुपम आज बाईक रॅली काढणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना लोखंडवाला शास्त्रीनगर येथील घरातून ताब्यात घेतलं आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश मतदारांचा अपमान असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 2 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि रॅली काढण्यापासून रोखलं आहे.