no images were found
कोल्हापुरात विमानांनी घेतले रात्रीचे उड्डाण
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील विमानांची नाइट लँडिंग सेवा अखेर सुरू झाली आहे. रविवारी रात्री प्रथमच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खासगी विमानाने रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी विमानतळावरून तिरुपतीकडे विमानाचे उड्डाण घेत या सेवेचा शुभारंभ केला.
कोल्हापूर विमानतळावरील विमानांची नाइट लँडिंग सेवा अखेर सुरू झाल्याने येत्या काळात कोल्हापुरात मोठमोठे उद्योगधंदे येण्यास आणखी मदत होईल. तसेच पर्यटन वाढीसाठी नाइट लँडिंग सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. कोल्हापूरच्या विकासाच्या दूरदृष्टीने छत्रपती राजाराम महाराजांनी ५ जानेवारी १९३९ ला हे विमानतळ बांधले. मात्र, नियमित विमानसेवा सुरू होण्यास तब्बल ७९ वर्षे लागले. अखेर ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापूरकर समाधान व्यक्त करत आहेत.
कोल्हापूर विमानतळावरून ‘व्हीएसआय’ व्हेंचर या कंपनीच्या ‘यूटी सीआरए’ या चार्टर विमानाने काल रात्री उड्डाण केले. कोल्हापुरातून रात्रीच्या वेळी उड्डाण करणारे ते पहिलेच विमान ठरले आहे. तर याचे पहिले प्रवासी होण्याचा मान मंत्री सामंत यांच्यासह नीलम सामंत, आस्मी सामंत, रवींद्र सामंत, स्वरूपा सामंत, केशव शिर्के, कविता शिर्के आणि रोहित कटके यांना मिळाला आहे. कोल्हापूर विमानतळावर नाइट लँडिंग सुविधा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी उड्डाण करणारा पहिला प्रवासी म्हणून मला संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आपण दिल्लीला जाणार आहोत. तिरुपतीला जाण्यासाठी कोठून जावे हा विचार करत होतो. कोल्हापुरात नाइट लँडिंगची सुविधा सुरू झाल्याचे समजले आणि येथून तिरुपतीला जाण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे कोल्हापुरात उद्योजक येतील, येथील औद्योगिक विकास होण्यास मदत होईल, त्याद़ृष्टीने लवकरच औद्योगिक वसाहतीची पाहणीही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.