Home सामाजिक ११ वर्षीय मुलाने खडकाळ विहिरीत उडी घेऊन मुलीचे वाचवले प्राण

११ वर्षीय मुलाने खडकाळ विहिरीत उडी घेऊन मुलीचे वाचवले प्राण

0 second read
0
0
26

no images were found

११ वर्षीय मुलाने खडकाळ विहिरीत उडी घेऊन मुलीचे वाचवले प्राण

जालना : जालन्याच्या सावन बारवाल या अवघ्या ११ वर्षांच्या मुलानं शेतातील विहिरीत बुडत असलेल्या १० वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या धाडसाबद्दल त्याच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी तत्परतेनं पाठवला आहे.
बदनापूर (जि.जालना) तालुक्यातील लालवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेला सावन रामदास बारवाल लालवाडी गावात वास्तव्यास आहे. २९ सप्टेंबर रोजी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याच शेतातील विहिरीत बुडणाऱ्या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या १० वर्षांच्या गौरी भिमसिंग बारवालचे प्राण वाचवले. सावन बारवाल २९ सप्टेंबरला सायंकाळी घरी अभ्यास करत होता. त्याची बहीण भाग्यश्री पाणी आणण्यासाठी बाजूच्या विहिरीवर गेली होती.३५ फूट खोल व खडकाळ असलेल्या विहिरीत भरपूर पाणी होते. तिथून पाणी आणण्यासाठी म्हणून तिच्या सोबत शेजारची गौरी भिमसिंग बारवाल ही पण विहिरीकडे पाणी भरण्यासाठी गेली. पाणी भरताना गौरीचा तोल गेला आणि ती अचानक विहिरीत पडली. गौरी पाण्यात पडताच भाग्यश्रीने जोराने आरडाओरडा सुरू केला व घरी येऊन आपला भाऊ सावन याला ही घटना सांगितली. ते ऐकताच अभ्यास करत बसलेल्या सावनने कोणताही विचार न करता थेट विहीर गाठून आतमध्ये उडी घेतली. गौरीच्या ड्रेसला पकडून विहिरीतील पाईप आणि मोटारीला धरून गौरीला विहिरीच्या कडेला आणले. तोपर्यंत ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली.गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत विहिरीच्या कडेला असलेल्या गौरी आणि सावन बारवाल याला विहिरी बाहेर काढले.
सावनच्या धाडसामुळे गौरीचे प्राण वाचले. त्यामुळे गावकऱ्यांनी सावनवर कौतुकाचा वर्षाव केला. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गौरीचे प्राण वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या सावन आणि त्याच्या पालकांचा लालवाडी ग्रामस्थांनी जोरदार सत्कार करून त्याला शाबासकी दिली. बदनापूरचे तहसीलदार मुंडलोड यांनी सावनला तहसीलमध्ये बोलावून त्याचा सत्कार केला.सावनच्या धाडसाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखिळ व उपशिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी त्याच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी तत्परतेनं पाठवला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…