no images were found
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन
मुंबई : चित्रपटसृष्टीला आणखी एक दुखद धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी लोकप्रिय भूमिका साकारल्या होत्या. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती
सुनील शेंडे घरातच चक्कर येऊन पडले. यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची सून जुईली शेंडे यांनी दिली. त्यांनी रात्री १ वाजता अखेरचा श्वास घेतला. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले. मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेता अशी त्यांची ओळख होती.
सुनील शेंडे यांनी सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘निवडुंग’ (१९८९), ‘मधुचंद्राची रात्र’ (१९८९), ‘जसा बाप तशी पोर’ (१९९१), ‘ईश्वर’ (१९८९), ‘नरसिम्हा’ (१९९१) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते लाइमलाईटपासून दूर होते.