Home राजकीय शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर- उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील

शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर- उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील

4 second read
0
0
37

no images were found

शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर– उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील

कोल्हापूर  : आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाच्या माध्यमातून राज्याचा व देशाचा विकास साधण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालय, कोल्हापूर व इंडो काऊन्ट फाऊंडेशन, गोकुळ शिरगांव एम. आय. डी. सी., कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) सुपूर्द सोहळा कार्यक्रम राधाबाई शिंदे सभागृह, सायबर महाविद्यालय, कोल्हापूर या ठिकाणी झाला, या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे डायरेक्टर कमल मित्रा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका अंजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने अभियांत्रिकी तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे मराठीकरण करण्याचे काम पूर्ण केले असून त्या पुस्तकांचे विमोचन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून भविष्यात वैद्यकीय शिक्षणसुध्दा मराठीतूनच उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.

देशातील खासगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही रक्कम सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने निर्बंध घातले असून त्यामुळे अशा शैक्षणिक संस्थांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

इंडो काऊन्ट फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्य (ई-लर्निंग किट) चा वापर करुन आश्रमशाळेतील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवतील. अशा शैक्षणिक साहित्याची भविष्यात गरज असून त्यामुळे रोजगार निर्मितीसही हातभार लागेल. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता कौशल्यावर आधारीत शिक्षण घेण्यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ई-लर्निंग साहित्याचा वापर करुन विविध क्षेत्रात ज्ञान मिळवावे तसेच संशोधनामध्येही अग्रेसर रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

इंडो काउन्ट सारख्या कंपन्यांनी संशोधन केंद्रे उभारणीसाठी तसेच संशोधन झालेले उत्पादन, शोध यांची संबंधितांना मालकी हक्क मिळवून देण्याकरीता सहकार्य करण्याचे त्यांनी सूचित केले.

कार्यक्रमाची सुरुवात आश्रमशाळा, कुशिरे येथील विद्यार्थीनींच्या स्वागत गीताने झाली. प्रास्ताविकामध्ये सहायक आयुक्त विशाल लोंढे म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती मधील कुटूंबे ही उदरनिर्वाहासाठी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असतात. तसेच अत्यंतिक गरीब परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलामुलींना शिक्षण देता येत नाही. दुर्बल घटकातील मुलामुलींचा शैक्षणिक विकास व्हावा व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी राज्य शासनाने आश्रमशाळा सुरु केल्या आहेत.

विजाभज समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शिक्षण घेऊन या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या या आश्रमशाळा मोलाचे कार्य करीत आहेत. त्याचबरोबर इंडो काउन्ट फाऊंडेशनने त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून जिल्ह्यामधील आश्रमशाळांना शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील.

इंडोकाऊंट इंडस्ट्रीचे डायरेक्टर कमल मित्रा यांनी इंडो काऊन्टच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर काम करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आश्वासित केले.

शैक्षणिक साहित्य ( ई-लर्निंग किट ) दिल्याबद्दल कमल मित्रा यांचा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थी अंजली पाटील तसेच पूर्वा कांबळे व समृध्दी कांबळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन इंडो काऊन्टचे सीएसआर सल्लागार अमोल पाटील यांनी केले तर आभार समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी मानले.

कार्यक्रमासाठी इंडोकाऊंट इंडस्ट्रीजचे सिनीअर व्हाईस प्रेसिडेंट शैलेश सरनोबत, जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सायबर महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…