no images were found
येऊ दे कितीही अडचणीचं वारं… ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका : १६ मार्चपासून संध्या. ७ वा. आपल्या कलर्स मराठी वर
असे म्हणतात की रक्ताच्या नात्यांपेक्षा कधी कधी मनाने जोडलेली नाती अधिक घट्ट असतात. ही नाती आपल्यासाठी कुठलाही संघर्ष झेलायला तयार असतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी राहतात आणि वेळ आली तर जीव ओवाळून टाकायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशाच भावनिक नात्यांच्या धाग्यावर आधारित आहे नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’.
या मालिकेची कथा आहे छवीची. रक्ताचं नातं नसतानाही छवीसाठी बाई-आजी म्हणजे देवासमान आहेत. त्यांच्यासाठी आणि राजगुरू परिवारासाठी छवी काहीही करायला तयार आहे. मात्र या कुटुंबाचं रक्षण करताना तिच्यासमोर अनेक संकटं उभी राहणार आहेत. या सगळ्या अडथळ्यांना छवी कशी सामोरी जाणार? ती हे सगळं कसं निभावून नेणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मालिका पाहावी लागणार आहे.
नुकताच या मालिकेचा प्रभावी प्रोमो प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर . त्या ‘बाई-आजी’ या ठाम, प्रभावी आणि वेगळ्या भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनही त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी स्वभाव ठळकपणे जाणवतो.
या मालिकेत छवीची गोड, सोज्वळ आणि मनमोकळी भूमिका जान्हवी तांबट साकारत आहे. तर शांभवीच्या भूमिकेत अमृता फडके दिसणार आहे. तसेच वत्सलाच्या भूमिकेत वंदना वाकणीस अनिकेतच्या भूमिकेत संचित चौधरी साकेतच्या भूमिकेत अमित रेखी आणि बेबी आत्याच्या भूमिकेत दिशा दांदळे महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
राजगुरू परिवाराचा डोलारा बाई-आजी सांभाळत आहेत. त्या या कुटुंबाच्या कर्ताधर्त्या आहेत. जशा जिजाबाई शिवाजी महाराजांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, तसंच बाई-आजी आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एका अपघातात मुलगा आणि सून अकाली गेले आणि त्यानंतर बाई-आजींनी साकेत आणि अनिकेत या नातवंडांना आईची माया दिली.
याच राजगुरू परिवारात लहानाची मोठी झाली आहे छवी. सुंदर-सुशील या पारंपरिक चौकटीत न बसणारी ही थोडीशी इंपरफेक्ट छवी—स्वभावाने बडबडी, उत्साही आणि मनाने खूप मोठी. प्रत्येक नात्यात मनापासून जीव ओतणारी. बाई-आजींचा रुबाब आणि छवीची त्यांच्यावर असलेली निष्ठा प्रत्येक क्षणी दिसून येते.
पण या परिवारावर वाकडी नजर आहे ती म्हणजे अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि सूडाने पेटलेली शांभवी. तिच्या मनात साचलेला भूतकाळ आणि सूडाची भावना राजगुरू परिवारावर मोठं संकट आणू शकते. शांभवीचा हा डाव छवीला समजेल का? आणि कितीही संकटं आली तरी छवी त्यांना खंबीरपणे कशी सामोरी जाणार?
बाई-आजी आणि छवी यांच्यातील अतूट विश्वासाचं नातं या मालिकेचा गाभा आहे. आयुष्याच्या कठीण क्षणी बाई-आजी प्रत्येक निर्णयासाठी छवीवर विश्वास ठेवताना दिसतात.
मालिकेविषयी बोलताना भारती आचरेकर म्हणाल्या, “बाई-आजी ही पारंपरिक चौकटीतली आजी नाही. ती उदारमतवादी, मोकळ्या विचारांची आणि काळानुसार बदल स्वीकारणारी ‘कूल’ आजी आहे. नातवंडांशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी पण घराचा कणा असलेली ही स्त्री आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत काम करते आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप उत्सुकतेचा टप्पा आहे.”
मालिकेविषयी बोलताना सतिश राजवाडे म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या धाटणीची आणि दर्जेदार कथा आणण्याचा असतो. बर्याच काळानंतर आम्ही अशी फिक्शन मालिका घेऊन येत आहोत जी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि मूल्यांची परंपरा यांचा संगम असलेली कथा आहे.”
या संघर्षात बबी आत्याची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. नात्यांमधील ताणतणाव, घरातील संघर्ष आणि एका ठाम स्त्रीचा खंबीर आवाज यांची झलक देणारा या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना अनेक प्रश्नांसह सोडून जातो.