no images were found
समुदाय विकासात रेडिओचे भरीव योगदान ः डॉ. सचिनकुमार पाटील
कोल्हापूर ः प्रतिनिधी :भारतीय समाजात रेडिओला विशेष महत्त्व आहे. अनेक स्थित्यंतरे आली तरी रेडिओची गरज कमी झाली नाही. उलट समुदायाच्या विकासात रेडिओ उत्तरोत्तर भरीव योगदान देत आहे, असे मत ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात मीडिया आणि कम्युनिकेशन क्लब अंतर्गत ‘कम्युनिटी रेडिओ समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते.
डॉ. पाटील म्हणाले, माहितीचा प्रसार करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. रेडिओसारख्या माध्यमाने विश्वासार्हतेच्या जोरावर समाजमनावर अधिराज्य गाजवले आहे. सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे माध्यम म्हणून रेडिओ नेहमीच माध्यमांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. कम्युनिटी रेडिओच्या रुपात त्याने समुदायाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
यावेळी जयप्रकाश पाटील यांनी कम्युनिटी रेडिओचा इतिहास विशद केला. अभिषेक पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिववाणी कम्युनिटी रेडिओबद्दल माहिती दिली. यावेळी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील डॉ. युवराज जाधव, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. अभार डॉ. सुमेधा साळुंखे यांनी मानले.